सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर शहरातील वेताळपेठ जुनी तालीम मंडळ यांच्यावतीने स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून आयोजित रक्तदान शिबिरात तरुणांनि मोठा प्रतिसाद दिल्याने ६५ बॅग रक्त संकलन झाले.दरम्यान प्रवासावेळीची सुरक्षा लक्षात घेऊन प्रत्येक रक्तदात्याला हेल्मेट भेट देण्यात आले.
कायमच सामाजिक कार्यात हिरहिरने भाग घेणाऱ्या वेताळपेठ जुनी तालीम मंडळ यांच्याकडून सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिर आयोजित केले गेले होते.मंडळ दरवर्षी नाविन्यपूर्ण विविध उपक्रम राबवीत असून यंदा रक्ताची गरज भासल्याचे कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिर राबविले. रक्तदान हे श्रेष्ठदान असल्याने शहरातील तसेच ग्रामीण भागातील अनेक तरुणांनी पुढे येऊन रक्तदान केले.
शिबिराचे उद्घाटन माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष गणेश पवार, नगरसेवक अमित सागळे, तोशीब आतार, मनीषा पवार, माजी नगरसेवक शांताराम शेडगे, देविदास गायकवाड, सुनील पवार,अध्यक्ष स्वप्निल कदम, उपाध्यक्ष अविनाश पवार यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रक्तदान शिबिरे काळाची गरज
विविध मंडळांच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम म्हणून रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात.रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून अनेक रक्ताच्या बॅग संकलन करण्याचे मोलाचे काम करून रुग्णांना रक्त पुरवण्याचे काम केले जाते.सध्याच्या काळात रुग्णांच्या उपचारासाठी वैद्यकीय क्षेत्रात रक्ताचा भासणारा तुटवडा लक्षात घेऊन पुढील काळात रक्तदान शिबिरे घेऊन रक्त संकलन करणे काळाची गरज असल्याचे मत माजी आमदार संग्राम थोपटे यांनी व्यक्त केले.
