भोर l कापुरव्होळ-वारजे प्रवासात दाम्पत्याला लाखोंचा फटका; एसटीतील गर्दीत २.९३ लाखांचे दागिने चोरीला

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
भोर : संतोष म्हस्के 
कापुरव्होळ ता.भोर ते वारजे दरम्यान एसटी बसमधून प्रवास करत असलेल्या दाम्पत्याच्या तब्बल २ लाख ९३ हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. बसमधील प्रवासी गर्दीचा फायदा घेत स्कार्फ बांधलेल्या दोन अनोळखी महिलांनी ही चोरी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तानाजी राजाराम जगदाळे (वय ६०, रा. वरवे खुर्द, ता. भोर, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. 

     पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी जगदाळे हे पत्नी मनिषा यांच्यासह दिनांक २० ऑगस्ट २०२६ रोजी कराड-दादर मार्गे उरणकडे जाणाऱ्या एसटी बसने कापुरहोळ ते पनवेल असा प्रवास करत होते. एसटी बस क्रमांक एम.एच. १४ एम.एच. ३०२५ मधून प्रवास सुरू असताना कापुरहोळ ते वारजे या प्रवासादरम्यान त्यांच्या जवळील सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. 

बसमध्ये मोठी प्रवासी गर्दी असल्याने, त्याच गर्दीचा फायदा घेत स्कार्फ बांधलेल्या दोन अनोळखी महिलांनी दागिने लंपास केल्याचा संशय फिर्यादीने व्यक्त केला आहे.
चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये ३ तोळे वजनाचे सोन्याचे गंठण, १४ ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस, ५ ग्रॅम वजनाची सोन्याची कानातील वेल, ७ ग्रॅम वजनाची सोन्याची फुले व झुमके तसेच २.५० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी यांचा समावेश आहे. 

चोरीस गेलेल्या सर्व दागिन्यांची एकूण अंदाजे किंमत २ लाख ९३ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात दोन अनोळखी महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार मयूर निंबाळकर करीत आहेत.
Tags
To Top