सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर : महेश जगताप
पिढ्यांन पिढ्या पारधी समाजाचा शिक्का..कमी वयात लग्न झालं..मात्र लग्नानंतरही समाजातील सर्व बंधने जुगारात, अंगावर खाकी चढवली. पण पतीकडून होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून अखेर तिने अखेर मृत्यूला कवटाळले.
बारामती तालुक्यातील करंजे येथील संगीता राजेंद्र काळे उर्फ संगीता किरण भोसले वय ३१ हिने पतीच्या वारंवार होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली. याबाबत मुंबई-डोंबवली येथिल विष्णुनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पतीला अटक करण्यात आली आहे. विष्णुनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,डोंबिवली पश्चिमेतील देवीचा पाडा परिसरात पतीकडून होणाऱ्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी विष्णुनगर पोलिस ठाण्यात महिलेच्या पतीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगिता राजेंद्र काळे ऊर्फ संगिता किरण भोसले (वय ३१) असे मृत विवाहितेचे नाव आहे. सुपे ता. बारामती येथे तिचे सासर तर करंजे येथे माहेर आहे.
सध्या त्या डोंबिवली पश्चिमेतील देवीचा पाडा परिसरात राहत होत्या. तिचा पती किरण भानुदास भोसले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत संगिता यांचा विवाह किरण भोसले यांच्याशी सन २०१८ मध्ये झाला होता. २०२३ पासून पतीला पत्नी सावळी असल्याचे आवडत नसल्याने तो तिच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेत असे आणि त्यातून तिला मारहाण करीत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच घरातील वस्तू खरेदी करण्यावरून ‘जास्त पैसे का खर्च केले’ या कारणावरूनही पती-पत्नीमध्ये वाद होत असल्याचे नमूद आहे.
पतीकडून सातत्याने होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून संगिता यांनी बेडरूममध्ये स्वतःला बंद करून सिलिंग फॅनला ब्लँकेटच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. त्यांच्या आत्महत्येस पतीने प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी सुलोचना राजेंद्र काळे रा. करंजे ता बारामती जि. पुणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून विष्णुनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रशांत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दरम्यान, संगीता हिच्या सासरच्या मंडळींनीही तिला आर्थिक मागणी करत सतत छळ केला आहे. त्यामुळे त्यांच्यावरही गुन्हे दाखल करा, अशी मागणी करत संगीताचे वडील यांनी केली. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यासमोर आज सकाळी शव ठेवण्यात आले होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते, फौजदार राहुल साबळे यांनी नातेवाईकांची समजूत काढली असून डोंबिवली पोलिसांनी पुरवणी जबाब अन्य आरोपींवर कारवाई करण्याची आश्वासन दिल्यावर संगीताच्या शवाचे सोमेश्वर मंदिरानजिक शेतात विधिपूर्वक दफन करण्यात आले.
----------चौकट----
बारामती तालुक्यात हळहळ----
संगीता काळे-भोसले हिने वडिलांच्या स्वप्नासाठी प्रचंड स्पष्ट करून पोलीस दलात भरती होण्यात यश मिळवले होते. तिच्यानंतर पारधी समाजात शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी एक चळवळच निर्माण झाली होती. परिसरातील पाच-सहा मुली तिला आदर्श मानून पोलीस भरती झाल्या होत्या. तिच्या पतीला लग्नानंतर तिनेच मार्गदर्शन केल्यामुळे पोलीस दलात त्यालाही भरती होण्यात यश मिळाले होते. तोही ठाणे पोलीस दलातच कार्यरत होता. मात्र सासरच्या शारीरिक-मानसिक छळा आदर्श निर्माण करणारी तरुणी हरवली अशी हळहळ परिसरात व्यक्त होत आहे.--
