सोमेश्वर रिपोर्टर टीम----
भोर : संतोष म्हस्के
भोरच्या आंबवडे खोऱ्यातील करंजे ता.भोर येथील महिला गावच्या हद्दीतील आंबवडे रस्त्याशेजारी शेतात जनावरे चारत असताना चारचाकी वाहनातून आलेल्या अज्ञात चोरट्याने नाझरे,कारी गाव कोठे आहे असे विचारीत गळ्यातील दीड तोळ्यांचे मंगळसूत्र हिसकावून लांबवले.
ही घटना गुरुवार दि.१० रोजी घडली असून महिला सुमल बाजीराव चिकणे(वय- ६५ ) रा. करंजे ता.भोर यांचे १ लाख ५० हजारांची नुकसान झाले. भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार करंजे येथील वयोवृद्ध महिला सुमल चिकणे गावाशेजारील शेतात गाय चारण्यासाठी गेल्या होत्या. गाय चारत असताना एका चारचाकी वाहनातून आलेला अज्ञात इसम याने महिलेच्या जवळ येऊन आंबवडे खोऱ्यातील दोन गावांचा पत्ता विचारला. वयोवृद्ध महिला पत्ता सांगत असताना अचानकपण अज्ञात इसमाने अचानक महिलेच्या गळ्यात हात टाकून दीड तोळ्याचे मंगळसूत्र लांबविले. यात एक तोळा वजनाचे डोरले व अर्धा तोळा वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरीला गेले.दरम्यान अज्ञात चोरटा पांढऱ्या चारचाकी गाडीतून भोर बाजूकडे पळून गेला.भोर तालुक्यात घरफोडी तसेच इतर चोऱ्या होत्या मात्र शेतात काम करणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने पळवून नेण्याचे प्रकार भोर तालुक्यात घडू लागल्याने महिला वर्गामध्ये भीतीचे वातावरण आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अजय साळुंखे, दीपक गायकवाड करीत आहेत.
