बारामती हादरली..! काऱ्हाटीच्या मुख्य चौकात तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; दोघांचा शोध सुरू

सोमेश्वर रिपोर्टर live

सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सुपे : प्रतिनिधी
तालुक्यातील काऱ्हाटी गावातील मुख्य चौकात भरदिवसा अमोल सदाशिव जाधव या तरुणावर कोयत्याने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. १८) घडली. या हल्ल्यात जाधव गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अमोल जाधव यांना काऱ्हाटीच्या मुख्य चौकात गाठून हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यासह हातावर तसेच शरीराच्या इतर भागांवर कोयत्याने वार केल्याचे समोर आले आहे. गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने पुण्यात उपचारासाठी हलविण्यात आले.

हा हल्ला पूर्वीच्या वादातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, या प्रकरणात ऋतिक आणि ओंकार या दोघांची नावे समोर आली असून, ते हल्ल्यानंतर फरार असल्याची माहिती आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके बारामती तालुक्यातील विविध भागांत रवाना करण्यात आली आहेत. हल्ल्याचे नेमके कारण, घटनेमागील पार्श्वभूमी आणि इतर बाबींचा पोलीस तपास करीत आहेत.

भरदिवसा गावाच्या मुख्य चौकात झालेल्या या घटनेमुळे काऱ्हाटी परिसरात खळबळ उडाली आहे.
To Top