सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली असून तब्बल पाच राजकीय पक्षांची या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी केली आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर ही कारखान्याची पहिलीच निवडणूक आहे. या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी (अप), राष्ट्रवादी (शप), भाजप, शिवसेना (शिंदे) तसेच शिवसेना (ठाकरे) या पाच राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली असून तब्बल ६०१ इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शिवसेना (शिंदे) व राष्ट्रवादी (शप) पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या असून उद्या दि. १९ रोजी भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडत आहेत.तर दुसरीकडे राष्ट्रवादी (अप) पक्षाने गावोगावी प्रचाराला सुरुवात केली आहे. गावोगावी जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला जात आहे. याच धामधुमीत आता दि. २१ रोजी कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडत असल्याने याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.
कारखान्याची २०२५-२०२६ या वर्षाची अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार, (दि. २१)सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता कारखाना कार्यस्थळावरील ‘छत्रपती शिवाजी महाराज’ प्रांगणात आयोजित करण्यात आली आहे. कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू असल्याने या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप व कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी सर्व सभासदांनी सभेला वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
या सभेत मागील दि. २९ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा वृत्तान्त कायम करणे, सन २०२५-२०२६ चा संचालक मंडळाचा अहवाल, ताळेबंद व नफा-तोटा पत्रके स्वीकारणे, अंदाजपत्रकातील तरतुदीपेक्षा जादा झालेल्या खर्चास मंजुरी देणे आदी विषयांवर चर्चा होणार आहे. तसेच सन २०२६-२०२७ च्या अंदाजपत्रकाची व भांडवल उभारणीबाबतच्या प्रस्तावाची नोंद घेणे, वैधानिक लेखापरीक्षण अहवालाची नोंद घेणे, मागील वर्षाच्या दोषदुरुस्ती अहवालाचा स्वीकार करणे, तसेच सन २०२६-२०२७ साठी वैधानिक लेखापरीक्षकाची नियुक्ती व लेखापरीक्षण शुल्क निश्चित करणे या विषयांवरही निर्णय घेतला जाणार आहे.
सन २०२५-२०२६ गाळप हंगामातील ऊस बिलातून भागविकास निधी बोजाअंतर्गत शिक्षण निधी कपात करण्याबाबत विचार करण्यात येणार आहे. अध्यक्षांच्या पूर्वपरवानगीने ऐनवेळी येणाऱ्या विषयांवरही सभेत चर्चा केली जाणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभेतील चर्चा व निर्णयांकडे सभासदांसह राजकीय व सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे. वार्षिक सर्वसाधारण सभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असल्याने सभेकडे सभासदांचे विशेष लक्ष लागले आहे. सभासदांकडून प्रश्न विचारले जाणार असून, संचालक मंडळाकडून त्याला काय उत्तर दिले जाते, याकडेही लक्ष राहणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर होणाऱ्या या सभेत सभासद आणि संचालक मंडळात कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.
