सुपे परगणा l जनाई योजनेचा प्रश्न पेटणार! मागण्या मान्य न झाल्यास २ ऑक्टोबरपासून उपोषण

सोमेश्वर रिपोर्टर live

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दिपक जाधव 
जनाई उपसा सिंचन योजनेच्या बंद पाइपलाइनच्या कामातील डिझाइनमध्ये आवश्यक बदल करावा, यासह विविध मागण्यांकडे जलसंपदा विभागाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघर्ष कृती समितीच्या वतीने येत्या २ ऑक्टोबरला गांधी जयंतीपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत समितीचे अध्यक्ष पोपटराव खैरे व जनरल सेक्रेटरी कैलास जगताप यांनी जलसंपदा मंत्री, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना निवेदन दिले आहे.
           बारामती, दौंड व पुरंदर तालुक्यातील जिरायती व कोरडवाहू भागातील पाझर तलाव खडकवासला धरण साखळीतील पाण्याने भरण्यासाठी सन १९९४ पासून जनाई उपसा सिंचन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेवर आतापर्यंत सुमारे ४५० कोटी रुपये खर्च झाले आहेत. मात्र, मुख्य कालव्यांना मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याने शेतकऱ्यांकडून बंद पाइपलाइनची मागणी सातत्याने करण्यात आली. त्यानुसार सुमारे ४५८ कोटी रुपयांची बंद पाइपलाइन योजना शासनाने मंजूर केली असून, निविदा प्रक्रिया तसेच डिझाइनचे काम करण्यात आले आहे.
        या योजनेच्या प्रस्तावित पाइपलाइनचे डिझाइन परिसरातील सुमारे ७५० तलाव ओव्हरफ्लो तसेच मंजूर पाणी कोट्यानुसार भरण्याच्या दृष्टीने करणे आवश्यक असल्याचे समितीचे म्हणणे आहे. मात्र सध्याचे डिझाइन प्रवाही सिंचन पद्धतीने करण्यात आल्याने पाझर तलावांना अपेक्षित पाणी मिळणार नाही. त्यामुळे खरीप व रब्बी हंगामातील पिकांवरही परिणाम होण्याची शक्यता समितीने व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रवाही सिंचनाऐवजी मुख्य कालव्यांसाठी आवश्यक व्यासाची पाइपलाइन करण्याची मागणी करण्यात आली आहे.
          दरम्यान, पुणे शहराच्या वाढत्या पाणीवापरामुळे भविष्यात खडकवासला धरण साखळीतील पाणी पुणे शहरासाठी राखीव ठेवण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे दौंड, इंदापूर, बारामती व हवेली तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता समितीने निवेदनात मांडली आहे. त्यासाठी दौंड तालुक्यातील हातवळण येथे पंपगृह उभारून जनाई टप्पा-१ च्या साठवण टाकीत व खडकवासला कालव्यात पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली आहे.
           मुख्य कालव्यांना बंद पाइपलाइन केल्यानंतर देखभाल-दुरुस्ती तसेच आवर्तनाच्या काळात व्हॉल्व्ह चालविण्यासाठी रस्त्यांची आवश्यकता असल्याने उर्वरित भूसंपादन तातडीने करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. तसेच योजनेवरील वीजबिलाचा खर्च शेतकऱ्यांना परवडत नसल्याने संपूर्ण योजना सौरऊर्जेवर चालविण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच बंद पाइपलाइनमुळे बचत होणारे पाणी पुणे महानगरपालिकेला न देता जनाई-शिरसाई परिसरातील पाण्यापासून वंचित गावांना द्यावे, अशी मागणी समितीने केली आहे. यामध्ये आंबी, चांदगुडेवाडी, राजबाग, शेरेवाडी, बाबुर्डी, काऱ्हाटी, जळगाव सुपे, अंजनगाव व गोजुबावी या गावांचा समावेश आहे.
             या मागण्यांबाबत जलसंपदा विभागाकडे वारंवार लेखी व तोंडी पाठपुरावा करूनही अपेक्षित दखल घेतली जात नसल्याचा आरोप समितीने केला आहे. त्यामुळे मागण्या मान्य होईपर्यंत सुपे ग्रामसचिवालया समोर २ ऑक्टोबरपासून आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
               .........................
To Top