Pune Crime l शिरूर हादरलं! लाटेआळी परिसरात गोळीबार करून ३५ वर्षीय तरुणाची हत्या

सोमेश्वर रिपोर्टर live

सोमेश्वर रिपोर्टर टीम----
शिरूर : प्रतिनिधी 
 शहरातील लाटेआळी, आंबेडकरनगर परिसरात शुक्रवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास गोळीबार करून हरी दादाभाऊ गंगावणे (वय ३५, रा. प्रीतम प्रकाशनगर, शिरूर) यांचा खून करण्यात आला. वर्दळीच्या परिसरात घडलेल्या या घटनेने शिरूर शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात रोहित सोनवणे, अनिकेत गव्हाणे आणि अन्य दोन जण संशयित असून, त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी चार पथके तयार केली आहेत.
विभागीय पोलिस अधिकारी रवींद्र भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी हरी गंगावणे यांच्या बिअर बारमध्ये पैसे देण्याच्या कारणावरून रोहित सोनवणे व अनिकेत गव्हाणे यांच्यासोबत वाद झाला होता. त्यावेळी हरी गंगावणे यांनी दोघांना मारहाण केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
दरम्यान, गुरुवारी मध्यरात्री गणेश मंडळासमोर हरी गंगावणे आणि संबंधित दोघे पुन्हा आमनेसामने आले. त्यावेळी त्यांच्यात बाचाबाची झाली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाद मिटवला आणि दोन्ही बाजूंना समज दिली होती. शुक्रवारी सकाळी हरी गंगावणे हे एका मित्रासोबत रोहित सोनवणे याच्या मामाच्या घरी गेले होते. तेथून दुचाकीवरून निघत असताना रोहित सोनवणे व त्याच्या साथीदारांनी गावठी पिस्तुलातून हरी यांच्यावर गोळीबार केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. गोळ्या लागल्याने हरी गंगावणे यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र भोसले यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत पोलिसांना सूचना केल्या. या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची चार पथके कार्यरत आहेत. पुढील तपास शिरूर पोलिस करीत आहेत.
To Top