सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
निरा-बारामती राज्य मार्गावरील सोरटेवाडी गावच्या कुलकर्णी चारीजवळ चारचाकी वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत मुरूम (ता. बारामती) येथील विकास ऊर्फ दशरथ सीताराम जगताप (वय 55 ) यांचा मृत्यू झाला. गुरुवारी (दि. २२) रात्री पाऊणेनऊ च्या दरम्यान झालेल्या या अपघातामुळे सोमेश्वरनगर व मुरूम परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, विकास जगताप हे कुलकर्णी चारीजवळील किराणा दुकानातून काही साहित्य खरेदी करून मित्रांच्या चारचाकी गाडीत बसण्यासाठी रस्ता ओलांडत होते. त्याचवेळी आलेल्या एका चारचाकी वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की, ते सुमारे पन्नास फूट लांब फेकले गेले. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
अपघातानंतर जखमी जगताप यांना तातडीने वाघळवाडी येथील साई सेवा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. धडक दिल्यानंतर संबंधित वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला. विकास ऊर्फ दशरथ जगताप यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक राजवर्धन शिंदे यांचे ते भाचे होत. त्यांच्या अकाली निधनाने जगताप कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, मुरूम व सोमेश्वर परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.



