सोमेश्वर रिपोर्टर टीम----
बारामती l प्रतिनिधी
महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर बारामती शहर पोलिसांनी बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणाऱ्या एका तरुणाविरुद्ध धडक कारवाई केली. या कारवाईत गावठी पिस्टल, तीन जिवंत काडतुसे आणि लाल रंगाची स्विफ्ट कार असा एकूण २ लाख २६ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आदित्य शेलार (रा. आमराई, बारामती) याला अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई गुरुवारी (दि. २२ ऑक्टोबर) रात्री टी. सी. कॉलेज परिसरातील आठ नंबर ग्राउंडजवळील मोरया पॅलेस इमारतीसमोरील सार्वजनिक रस्त्यावर करण्यात आली. प्रभारी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक मनीषा ओमासे यांच्या नेतृत्वाखाली आणि पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या समन्वयातून पोलिसांनी ही कारवाई केली.
गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई
पोलीस प्रसिद्धीपत्रकानुसार, २२ ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पोलीस शिपाई अक्षय सिताफ यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, आदित्य शेलार हा लाल रंगाच्या स्विफ्ट कारमधून टी. सी. कॉलेज परिसरात बेकायदेशीर अग्निशस्त्र घेऊन फिरत आहे. या माहितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांना कळविण्यात आले. त्यानंतर मनीषा ओमासे यांनी पोलीस पथकासह संशयिताचा शोध सुरू केला.
रात्री सुमारे ८.३५ वाजता संबंधित कार संशयास्पद स्थितीत उभी असल्याचे पोलिसांना आढळले. कारची दोन स्वतंत्र पंचांच्या उपस्थितीत तपासणी केली असता चालकाच्या सीटजवळ देशी बनावटीचे गावठी पिस्टल आणि त्याच्या मॅगझीनमध्ये एक जिवंत काडतूस मिळाले. त्यानंतर संबंधित तरुणाची अंगझडती घेतली असता त्याच्या जॅकेटच्या खिशात आणखी दोन जिवंत काडतुसे आढळून आली. अग्निशस्त्र बाळगण्याचा वैध परवाना आहे का, अशी विचारणा केली असता त्याच्याकडे परवाना नसल्याचे त्याने सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
२ लाख २६ हजारांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी केलेल्या कारवाईत २५ हजार रुपये किमतीचे गावठी पिस्टल, १ हजार २०० रुपये किमतीची तीन जिवंत काडतुसे आणि २ लाख रुपये किमतीची लाल रंगाची मारुती सुझुकी स्विफ्ट कार असा एकूण २ लाख २६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अग्निशस्त्राचा स्रोत शोधण्याचे काम सुरू
पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत संबंधित अग्निशस्त्र मयूर मोरे (रा. मेडद, ता. बारामती) याच्याकडून मिळाल्याचे आरोपीने सांगितल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे. या माहितीच्या आधारे अग्निशस्त्राचा मूळ स्रोत, त्याचा संभाव्य बेकायदेशीर पुरवठा आणि या प्रकरणातील इतर व्यक्तींचा सहभाग याबाबत पोलीस तपास करीत आहेत. या उल्लेखावरून संबंधित व्यक्तीचा गुन्ह्यातील सहभाग सिद्ध झाला आहे, असे मानता येत नाही.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची कामगिरी
पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या पथकात पोलीस हवालदार ज्ञानदेव क्षीरसागर, पोलीस शिपाई कवितके, पोलीस शिपाई अक्षय सिताफ आणि पोलीस हवालदार अभिजीत कांबळे यांनी सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार ज्ञानदेव विष्णू क्षीरसागर करीत आहेत.



