Indapur Breaking l भिगवण येथील प्रसिद्ध कापड व्यावसायिकाच्या पत्नीची आत्महत्या; परिसरात खळबळ, पोलिसांकडून तपास सुरू


सोमेश्वर रिपोर्टर टीम-----

​भिगवण :  प्रतिनिधी

भिगवण बाजारपेठेतील एका नामांकित आणि प्रसिद्ध कापड व्यावसायिकाच्या पत्नीने अचानक टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण भिगवण बाजारपेठ आणि परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.


​मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार प्रियांका संदीप गुंदेचा वय 39 रा. ताराई आनंद थोरात नगर हे आत्महत्या केलेल्या व्यावसायिक पत्नीचे नाव आहे. प्रियांका यांनी थोरात नगर येथील राहत्या घरी पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. या आत्महत्या करण्यामागचे अचूक कारण अजूनही अस्पष्ट आहे. मात्र, ही आत्महत्या खासगी सावकारी आणि भिशी व्यावसायिकांच्या तगाद्यामुळे झाली की यामागे काही कौटुंबिक वा घरगुती कारण आहे, या दोन्ही शक्यता विचारात घेऊन भिगवण पोलीस सध्या सर्व बाजूंनी सखोल तपास करत आहेत.

​घटनेची माहिती मिळताच भिगवण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि या प्रकरणी संदीप गुंदेचा यांनी खबर दिली असून प्राथमिक स्तरावर आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.


​घटनास्थळी सापडली संशयास्पद डायरी!


दरम्यान, पोलिसांना घटनास्थळावरून एक डायरीसारखी वस्तू हस्तगत झाल्याची चर्चा दिवसभर भिगवण बाजारपेठेत सुरू होती. या डायरीमध्ये आत्महत्येमागील नेमके कारण किंवा काही महत्त्वाच्या नोंदी असू शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे. या डायरीची बारकाईने तपासणी करत असून, यावरून तपासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.

​पोलीस प्रशासनाकडून सध्या आकस्मित मृत्यू या प्राथमिक दिशेने तपास सुरू असून, तपासाअंती आणि महत्त्वाचे पुरावे हाती आल्यानंतर माहिती समोर  येईल, अशी माहिती चर्चेतून मिळत आहे. एका प्रसिद्ध व्यापाऱ्याच्या कुटुंबातील या घटनेमुळे भिगवण परिसरात शोककळा पसरली आहे.

To Top