सोमेश्वर रिपोटर टीम——
पुणे : प्रतिनिधी
पुणे-अहिल्यानगर महामार्गावर वाघोली हद्दीतील विठ्ठलवाडी कमानीजवळ मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला, तर अन्य दोघे जखमी झाले आहेत. भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार डिव्हायडर ओलांडून पलटी झाली. त्यानंतर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला कारची जोरदार धडक बसली. या भीषण घटनेमुळे वाघोली परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री सुमारे १ वाजून २५ मिनिटांच्या सुमारास हा अपघात घडला. पुणे-अहिल्यानगर महामार्गावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे कार डिव्हायडर ओलांडून पलटी झाली. त्यानंतर पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनमध्ये सुमारे ६० ते ७० मीटर अंतरावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला कारची जोरदार धडक बसली.
या अपघातात ओमकार अजय सूर्यवंशी (वय २४), शंकर वासुदेव ढोळे (वय २२) आणि मयूर सतीश औटी (वय २६/२७) या तिघांचा मृत्यू झाला. तिघेही वाघोली येथील फूलमळा रोड परिसरातील रहिवासी होते. अपघातानंतर जखमींना तातडीने वाघोलीतील आय मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर तिघांना मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेह ससून रुग्णालयात हलविण्यात आले.
दरम्यान, आशुतोष नंदकुमार मरकड (वय २८) आणि प्रणय भरत शिंदे (वय २४) हे दोघे या अपघातात जखमी झाले आहेत. त्यांच्यावर आय मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू असून दोघेही शुद्धीवर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अपघाताची माहिती मिळताच वाघोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून अपघाताचा पुढील तपास आणि कायदेशीर कारवाई सुरू आहे. मध्यरात्री घडलेल्या या भीषण अपघाताने तीन तरुणांचे आयुष्य संपल्याने फूलमळा रोड परिसरासह वाघोलीत हळहळ व्यक्त होत आहे.




