सोमेश्वर रिपोटर टीम——
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
मुरूम (ता. बारामती) येथील जय मल्हार तालीम संघाच्या खेळाडूंनी कुस्ती आणि ज्युदो या क्रीडा प्रकारांत राष्ट्रीय, राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी करत पदकांची लयलूट केली आहे. दिल्ली येथे झालेल्या ७० व्या नॅशनल स्कूल गेम्स २०२६-२७ रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना संघाच्या खेळाडूंनी एक सुवर्ण आणि एक कांस्यपदक पटकावत मुरूमच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेत श्रावणी संजय शिंदे हिने १४ वर्षांखालील ३३ किलो वजनगटात प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक पटकावले. समृद्धी प्रवीण सावंत हिने १४ वर्षांखालील ३० किलो वजनगटात तृतीय क्रमांक मिळवत कांस्यपदकाची कमाई केली.
खोपोली येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत अमृता संजय शिंदे हिने १९ वर्षांखालील ५० किलो वजनगटात द्वितीय क्रमांक मिळवला. तर पंढरपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत कौस्तुभ सोमनाथ भंडलकर याने १७ वर्षांखालील ४८ किलो वजनगटात तृतीय क्रमांक पटकावला.
ज्युदो स्पर्धेतही जय मल्हार तालीम संघाच्या खेळाडूंनी आपली छाप पाडली. अकोला येथे झालेल्या राज्यस्तरीय ज्युदो स्पर्धेत श्रेयश मल्हारी भंडलकर याने द्वितीय, तर अविष्कार हेमंत वायाळ याने तृतीय क्रमांक मिळवला. पुण्यातील बालेवाडी येथे झालेल्या जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेत कुणाल सोमनाथ भंडलकर याने प्रथम क्रमांक पटकावला. अनिकेत आटोळे, कौस्तुभ भंडलकर व देवराज काशीद यांनी द्वितीय, तर उन्मेष भंडलकर, माउली भंडलकर व शिवम भंडलकर यांनी तृतीय क्रमांक मिळवला.
अजयश्री मल्टीपरपज हॉलमध्ये झालेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत देवराज कौस्तुभ चव्हाण आणि शिवम महेश भंडलकर यांनी द्वितीय क्रमांक मिळवत संघाच्या पदकतालिकेत आणखी भर घातली.
या सर्व यशस्वी खेळाडूंना मल्हारी भंडलकर, सौरभ जाधव, बच्चन आटोळे, प्रवीण सावंत, भगवान शिंदे, गणेश काशीद, आनंदराव भंडलकर, सोमनाथ भंडलकर, उमाजी भंडलकर, हेमंत वायाळ, निलेश मदने, अभिजित काकडे, संजय शिंदे तसेच क्रीडा शिक्षक डी. वाय. जगताप व अशोक भोसले यांचे मार्गदर्शन लाभले.
या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व खेळाडूंचा सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजवर्धन शिंदे आणि दूध संघाचे संचालक कौस्तुभ चव्हाण यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.





