सोमेश्वर रिपोर्टर टीम—–
बारामती : प्रतिनिधी
ग्रामीण भागातील खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कटफळ येथील क्रीडा संकुल महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या क्रीडा संकुलाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी ७५ कोटी १३ लाख रुपयांच्या निधीला मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली असून, या टप्प्याचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना सुनेत्रा पवार यांनी क्रीडा संकुलाचे काम पारदर्शकपणे, गुणवत्तापूर्ण आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या संकुलामुळे बारामतीच्या क्रीडा क्षेत्राला नवी दिशा मिळणार असून ग्रामीण भागातील खेळाडूंना आधुनिक सुविधा आणि सरावासाठी उत्तम व्यासपीठ उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तिसऱ्या टप्प्यात ४०० मीटर धावण्याचा ट्रॅक, पॅव्हेलियन इमारत, ऑलिम्पिक दर्जाचा जलतरण तलाव, फुटबॉल मैदान, २०० मीटर स्केटिंग रिंग, बास्केटबॉल मैदान, क्रिकेट पीच, संरक्षण भिंत, अंतर्गत रस्ते आणि पार्किंग व्यवस्था अशा विविध सुविधांची उभारणी करण्यात येणार आहे. यामुळे खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी आवश्यक प्रशिक्षण आणि पोषक वातावरण मिळणार आहे.
बारामतीला आधुनिक क्रीडा केंद्र बनविण्याचे स्वप्न दिवंगत अजित पवार यांचे होते. शिक्षण, आरोग्य, कृषी, उद्योग, पायाभूत सुविधा आणि क्रीडा अशा प्रत्येक क्षेत्रात बारामतीला पुढे नेण्याचा त्यांचा ध्यास होता. तरुणांना शिक्षणासोबतच खेळातूनही आपले भविष्य घडवता यावे, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांचे हे स्वप्न साकार करण्यासाठी क्रीडा संकुलाची उभारणी महत्त्वपूर्ण ठरेल, असेही सुनेत्रा पवार यांनी नमूद केले.
यावेळी नगराध्यक्ष सचिन सातव, पंचायत समिती सभापती किरण तावरे, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, क्रीडा विभागाचे उपसंचालक युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, कार्यकारी अभियंता अमोल पवार, तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले आदी उपस्थित होते.
दरम्यान, महात्मा जोतीराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्यांना अभिवादन केले. कार्यक्रमाला बारामती शहरातील मान्यवर, खेळाडू, ग्रामस्थ आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



