राजगड l लोकसहभागातून वनराई बंधारा; भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचा गुंजवणे येथे उपक्रम; आयुक्तांसह अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांचे उत्स्फूर्त श्रमदान


सोमेश्वर रिपोर्टर टीम-----

राजगड : प्रतिनिधी

भूजल संवर्धन व जलसंधारणासाठी लोकसहभाग वाढविण्याच्या उद्देशाने भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी केलेल्या आवाहनास अनुसरून पुणे जिल्ह्यातील गुंजवणे, ता. राजगड येथे लोकसहभागातून एका नवीन वनराई बंधाऱ्याचे बांधकाम व यापूर्वी ग्रामपंचायतीमार्फत बांधण्यात आलेल्या एका वनराई बंधाऱ्याचे पुनरुज्जीवन यशस्वीरीत्या करण्यात आले.

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे आयुक्त कार्यालय, उपसंचालक कार्यालय, पुणे विभाग, वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालय, पुणे तसेच ग्रामपंचायत गुंजवणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी स्वतः प्रत्यक्ष श्रमदान करून अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांना प्रेरित केले. त्यांच्या सक्रिय सहभागामुळे उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. सर्व अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांनी सामूहिक श्रमदानातून दोन्ही बंधाऱ्यांची कामे यशस्वीरीत्या पूर्ण केली.

या उपक्रमात अतिरिक्त संचालक विजय पाखामोडे, सहसंचालक राहुल ब्राह्मणकर, उपसंचालक माधवी दुबे यांच्यासह भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या तिन्ही कार्यालयांतील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. तसेच गुंजवणे ग्रामपंचायतीचे सरपंच  गुलाबराव रसाळ, उपसरपंच  राजाराम रसाळ आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

सदर उपक्रमाच्या पूर्वतयारीमध्ये अत्यंत अल्पावधीत योग्य स्थळांची निवड करणे, स्थानिक ग्रामपंचायतीशी समन्वय साधणे तसेच आवश्यक लोकसहभाग सुनिश्चित करणे ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सहाय्यक भूवैज्ञानिक श्रीमती आर. एस. गायकवाड व टी. पी. पखाले यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

भूजल पुनर्भरणाच्या दृष्टीने या उपक्रमास विशेष महत्त्व आहे. सदर वनराई बंधाऱ्यांच्या संभाव्य प्रभावक्षेत्रात गावाच्या पाणीपुरवठ्याची विहीर स्थित आहे. अशा परिस्थितीत या जलसंधारण कामांमुळे स्थानिक पातळीवर पाणी अडविण्यास मदत होऊन भूजल पुनर्भरणास पूरक परिस्थिती निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

याप्रसंगी यंत्रणेचे आयुक्त  रविंद्र खेबुडकर यांनी ग्रामस्थांशी संवाद साधताना जलसंधारणाचे महत्त्व विशद केले. स्थानिक पातळीवरील अशा छोट्या परंतु परिणामकारक उपाययोजनांमधून भूजल संवर्धनास चालना मिळू शकते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

गावाच्या पाणीपुरवठ्यासाठी प्रामुख्याने भूजलावर अवलंबून असलेल्या गुंजवणे ग्रामपंचायतीच्या वतीने या लोकाभिमुख उपक्रमाबद्दल भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

उपक्रमाच्या समारोपप्रसंगी वरिष्ठ भूवैज्ञानिक श्री. जयंत मिसाळ यांनी सर्व सहभागी अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांचे आभार मानले.

जलसंधारण, लोकसहभाग आणि प्रशासकीय समन्वयाचा आदर्श घालून देणारा हा उपक्रम भूजल संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित करणारा ठरला. 


असे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये बंधारा बांधण्याचे काम आज राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एका गावामध्ये भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेद्वारा करण्यात आले.

Tags
To Top