बारामती l सोमेश्वरनगर परिसरात वडगांव निंबाळकर पोलिसांकडून सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्या चांदीच्या दुकानांचा पोलीस बंदोबस्त वाढवला


सोमेश्वर रिपोर्टर टीम----

बारामती l प्रतिनिधी

सणासुदीच्या काळात बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी आणि सोन्या-चांदीच्या दुकानांमध्ये वाढणारी ग्राहकांची वर्दळ लक्षात घेऊन वडगाव निंबाळकर पोलिसांनी सोमेश्वरनगर परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे. परिसरातील सोन्या-चांदीच्या दुकानांबाहेर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

सणासुदीच्या काळात चोरी, फसवणूक तसेच इतर अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. सराफा दुकानांच्या परिसरात पोलिसांची गस्त वाढविण्यात आली असून संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे.

नागरिकांनी दागिने खरेदी-विक्री करताना तसेच आर्थिक व्यवहार करताना सतर्क राहावे. कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाल निदर्शनास आल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

सणासुदीचा उत्साह कायम राखत नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी वडगाव निंबाळकर पोलिसांनी घेतलेल्या या खबरदारीमुळे व्यापारी आणि नागरिकांना दिलासा मिळणार आहे. याबद्दल पुनम ज्वेलर्सचे शुभम आळंदीकर यांनी पोलिसांचे आभार मानले..

Tags
To Top