Pimpri-Chinchwad News | पिंपरी-चिंचवडच्या विकासाला नवी गती; अजितदादांचे स्वप्न पूर्ण करण्याचा सुनेत्रा पवारांचा निर्धार!


सोमेश्वर रिपोटर टीम——

पुणे : प्रतिनिधी 

दि. २३ पिंपरी-चिंचवड शहराला सुंदर, नियोजनबद्ध आणि विकसित शहर बनवण्याचे अजित पवार यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे. शहराच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असून, शहरातील प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी शासन खंबीरपणे पाठीशी उभे राहील. सुरू असलेली सर्व विकासकामे दर्जेदार आणि निर्धारित वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत आयोजित विकासकामांच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, प्रशांत शितोळे आदी उपस्थित होते.

सुनेत्रा पवार म्हणाल्या की, पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासासाठी अजितदादांनी मोठे योगदान दिले आहे. शहराच्या विकासासाठी त्यांनी घेतलेले कष्ट, दाखवलेली निष्ठा आणि दूरदृष्टी सर्वांना माहीत आहे. शहराच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक बाबीला त्यांनी नेहमीच प्राधान्य देत निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे आज पिंपरी-चिंचवडचा उल्लेख झाला की अजितदादांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. त्यांनी पाहिलेले विकासाचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आता सर्वांची आहे.

मोशी येथील कचरा दुर्घटना अत्यंत वेदनादायी होती. भविष्यात अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घ्यावी. कचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. मोशी येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा आढावा घेतला जाईल. प्रकल्पाचे काम कोणत्या टप्प्यावर आहे, याची माहिती घेऊन ते प्रलंबित न ठेवता तातडीने पूर्ण करावे, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.

राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे विविध भागांतून नागरिक रोजगारासाठी पिंपरी-चिंचवड शहरात स्थलांतरित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येचा संभाव्य भार लक्षात घेऊन पाणीपुरवठा, निवारा, आरोग्य, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधांबाबत प्रशासनाने आतापासूनच नियोजन करावे. पवना आणि इंद्रायणी नद्यांवरील अतिक्रमणे रोखण्यासह नदी पुनरुज्जीवनाच्या कामांना गती द्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करावे. औद्योगिक क्षेत्रातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. नाशिक फाटा ते एलिव्हेटेड कॉरिडॉरचे काम पूर्णत्वाकडे असून, लवकरच त्याचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

राज्य शासनाकडे प्रलंबित असलेल्या विविध प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत लवकरच स्वतंत्र बैठक घेण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेला पुन्हा देशातील अग्रगण्य आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम महापालिका बनवण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत. शहराच्या विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर शासन महापालिका प्रशासनाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही सुनेत्रा पवार यांनी दिली.

To Top