Pune Breaking l पुण्यातील गुन्हेगारी प्रवृत्ती खपवून घेणार नाही; कोयता गँग आणि ड्रग्ज माफियांवर कठोर कारवाई करा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार


सोमेश्वर रिपोर्टर टीम—–

पुणे : प्रतिनिधी

पुणे शहर आणि जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने अधिक सतर्क राहावे. गुन्हेगारी प्रवृत्तींचे कोणतेही कृत्य खपवून घेतले जाणार नाही. कोयता गँग, ड्रग्ज माफिया आणि अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई करून गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा धाक निर्माण करा, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले.

पुण्यातील शासकीय विश्रामगृहात पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण पोलीस विभागाच्या कामकाजाचा तसेच कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, विनयकुमार चौबे, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपकुमार गिल यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

शिवाजीनगर न्यायालय परिसरात घडलेली खुनी हल्ल्याची घटना अत्यंत दुर्दैवी असून, अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर द्यावा. गुन्हेगारी हालचालींची गोपनीय माहिती संकलित करणारी यंत्रणा अधिक सक्षम करावी. अवैध शस्त्रे बाळगणारे, कोयता गँग आणि ड्रग्ज माफियांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पवार यांनी दिल्या.

शहरातील सार्वजनिक ठिकाणी पोलीस गस्त आणि सुरक्षा व्यवस्था वाढवावी. संवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवून नियमित तपासणी करावी. तसेच वाहतूक व्यवस्था अधिक शिस्तबद्ध करण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, असेही त्यांनी सांगितले.

शिवाजीनगर न्यायालय परिसरातील घटनेवरून संपूर्ण पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य ठरणार नाही. मात्र, अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पोलीस दलाने आपल्या कामगिरीत सुधारणा करावी. आगामी काळात पोलिसांचा धाक आणि दबदबा नागरिकांना दिसून येईल, असा विश्वासही सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला.

पुणे शहराची शांतता, सुरक्षितता आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने अधिक सतर्क, सक्षम आणि परिणामकारकपणे काम करावे. या कामात नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

Tags
To Top