Pune News l बारामती तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे होणार हायटेक; आधुनिक रक्त तपासणी यंत्रे मिळणार! - करण खलाटे


सोमेश्वर रिपोटर टीम—-

बारामती : प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला आधुनिकतेची जोड मिळणार असून, तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अत्याधुनिक रक्त तपासणी यंत्रे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना आता विविध रक्त तपासण्यांसाठी खासगी प्रयोगशाळांवर अवलंबून राहण्याची गरज कमी होणार आहे. पुणे जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या १३० तपासणी यंत्रांचे जिल्हा परिषदेत वितरण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य करण खलाटे यांनी दिली.

होळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील जनआरोग्य समितीच्या बैठकीत प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येच आधुनिक रक्त तपासणी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत समितीचे अध्यक्ष करण खलाटे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे पाठपुरावा केला. दोन्ही मंत्र्यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुणे जिल्ह्यासाठी १३० तपासणी यंत्रे उपलब्ध करून देण्यात आली.

जिल्हा परिषदेत झालेल्या वितरण कार्यक्रमाला अध्यक्ष वीरधवल जगदाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, बांधकाम व आरोग्य समितीच्या सभापती दिपाली हुलावळे, सभागृह नेते श्रीमंत ढोले आणि जिल्हा परिषद सदस्य करण खलाटे उपस्थित होते.

या यंत्रांमध्ये बायोकेमिस्ट्री ॲनालायझर आणि थ्री-पार्ट हेमॅटोलॉजी ॲनालायझर या आधुनिक उपकरणांचा समावेश आहे. या माध्यमातून रक्तातील विविध घटकांच्या तपासण्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येच करणे शक्य होणार आहे. त्यामुळे रुग्णांचा वेळ आणि पैसा वाचण्यासोबतच आजारांचे वेळेत निदान होण्यास मदत होणार आहे.

या बैठकीला जनआरोग्य समितीचे सदस्य तथा पंचायत समिती सदस्य दिग्विजय जगताप, आशाताई वायाळ, जितेंद्र पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे आणि डॉ. राजगे उपस्थित होते.

ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असून, बारामती तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आधुनिक तपासणी सुविधा उपलब्ध झाल्याने सर्वसामान्य रुग्णांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Tags
To Top