सलून दुकाने सुरु करण्यास परवानगी द्यावी
बारामती नाभिक समाजाची मागणी
प्रांतधिकाऱ्यांना निवेदन
सुपे दीपक जाधव प्रतिनिधी
राज्यातील नाभिक समाजाचा व्यवसाय गेली तीन महिने बंद आहे. समाजाची उपासमार सुरु असल्याने सलून दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी. अथवा शासनाकडून दहा हजाराचे अनुदान देण्याची मागणी बारामती तालुका नाभिक संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. येथील प्रांतअधिकारी दादासाहेब कांबळे यांना यासंदर्भातील निवेदन देण्यात आले आहे.
शासनाच्या आदेशानुसार नाभिक समाजाने २३ मार्च पासुन दुकाने बंद ठेवली आहेत. त्यामुळे नाभिक समाजातील बहुतांश कुटुंबाची उपासमार होत आहे. यासंदर्भात शासनाकडे वेळोवेळी मदतीची मागणी केली मात्र दखल घेतली नाही. त्यानंतर पाचव्या लॉक डाऊनला बहुतांश सर्व दुकाने उघडण्यास परवानगी मिळाली. मात्र नाभिक समाजाची दुकाने उघडण्यास परवानगी मिळाली नाही. त्यामुळे हातावर पोट असलेल्या समाजाची फरफटच सुरु आहे. अनेकांनाचा संसार रोजच्या मिळालेल्या पैशावर सुरु असतो. मात्र आता लॉक डाऊनमुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. मागिल ५ जुनला शासनाला एक स्मरणपत्र देण्यात आले होते. मात्र त्याची दखल घेण्यात आलेली नाही.
त्यामुळे शासनाने सलून दुकाने उघडण्यास अथवा कुटुंबांना प्रत्येकी दहा हजाराची मदत देण्याची मागणी बारामती शहर तसेच तालुका ग्रामीण नाभिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच येत्या रविवार ( दि. १४ ) पर्यंत सलून दुकाने उघडण्यास शासनाने परवानगी द्यावी. अन्यथा येत्या सोमवार ( दि. १५ ) पासुन तहसिल कार्यालयासमोर चक्री आंदोलन करणार असल्याची माहिती निवेदनात देण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांना मेलद्वारे निवेदन देण्यात आल्याची माहिती शहर नाभिक संघाचे अध्यक्ष नवनाथ आपुणे यांनी दिली.
दरम्यान प्रांतअधिकारी कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की नाभिक समाजाचे निवेदन शासनदरबारी त्वरीत पोहचवण्यात येईल. तसेच लवकरच शासन यातुन मार्ग काढेल अशी अपेक्षा कांबळे यांनी समजापुढे व्यक्त केली.
.............................................
COMMENTS