बेंदूरामुळे बैलांच्या सजावटीचे साहित्य बाजारपेठेत :
कोरोना संकटामुळे खरेदीवर परिणाम
पुरंदर : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्याच्या दक्षिण-पुर्व पट्यातील गावांमधून आषाढी अमावस्येला बेंदूर सण साजरा होत असतो. यावर्षी शनिवारी हा सण साजरा होणार आहे. या सणानिमित्त बैलांच्या सजावटीसाठी मोठ्या प्रमाणात साहित्य खरेदी केले जाते. त्यामुळे या साहित्याच्या विक्रीसाठी अनेक दुकाने सजली आहेत. मात्र कोरोना मुळे मिरवणूक काढण्यास बंदी असल्याने व शेतकऱ्यांमध्ये तितकासा उत्साह नसल्याने खरेदीवर परिणाम जाणवत आहे.
बेंदूर म्हणजे शेतकऱ्याच्या सर्जा राजाचा सण. आपल्या शेतामध्ये वर्षभर राबणाऱ्या या सर्जा-राजाचं कौतुक करावं म्हणून बळीराजा हा सण साजरा करत असतो. हा सण कर्नाटकी बेंदूर म्हणून ओळखला जातो. कारण महाराष्ट्रापेक्षा कर्नाटकात हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. पुरंदर तालुक्यातील नीरा नदीकाठच्या काही गावांमधून हा सण साजरा केला जातो.
पुरंदर तालुक्यातील दक्षिण-पुर्व पट्यातील गावांमधून म्हणजेच नीरा नदीकाठच्या वीर, जेऊर, मांडकी, नीरा, पिंपरे (खुर्द) गुळूंचे, परिंचे या गावांमधून हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावेळी बैलांना सजवलं जातं. बैलांच्या सजावटीचे साहित्य मोठ्या प्रमाणात खरेदी केले जाते. बाजारपेठेमध्ये बैलांच्या सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्यांनी दुकाने फुलून गेली आहेत. कोरोनाच्या भितीने बाजारपेठेत बैलांच्या सजावटीसाठी लागणाऱ्या सामानांची खरेदीसाठी शेतकरी गर्दी करताना दिसत नाहीत.
यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बळीराजाकडे पैसा तर कमी आहेतच पण कोरोनामुळे आलेल्या टंचाईमुळे बैलांच्या सजावटीसाठी लागणारे साहित्य सुद्धा महागले आहे. त्यामुळे थोडी फार काटकसर करीत बळीराजा आपल्या लाडक्या सर्जा-राजाच्या सजावटीचे गरजेचे सामान खरेदी करताना दिसत आहे. बैलांच्या सजावटीसाठी लागणारे साहित्यामध्ये यावर्षी पेक्षा दहा ते वीस टक्के वाढ झाल्याचे येथील व्यापारी सांगतायत. शेतकरी मात्र सजावटीचे साहित्य महागले असले तरी आपल्या सर्जा राजासाठी काटकसर करत साध्या पद्धतीने हा सण साजरा करणार असल्याचे म्हणतो आहे. ज्या शेतकऱ्यांच्या कडे बैलं नाहीत ते कुंभाराने तयार केलेल्या मातीचे बैल घरी नेतात. त्या मातीच्या बैलांची देवघरा पुढे पुजा केली जाते. ती मातीची बैलं ही महाग झाली आहेत. तरीही शेतकरी मोठ्या श्रद्धेने मातीची बैलं खरेदी करत आहेत.
COMMENTS