जेजुरी शहर व परिसर प्रतिबंधक क्षेत्र म्हणून जाहीर
पुरंदर : प्रतिनिधी
दि. ८ जुलै पासून जेजुरी शहरात १४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून दि १० रोजी एका पॉझिटिव्ह रुग्णाचे निधन झाले आहे. कोरोना संसर्गाचा प्रसार त्वरित होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जेजुरी शहर व परिसर प्रतिबंधक क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले असल्याचे माहीती तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी दिली आहे .
पुरंदर तालुक्यात ११ जुलै पर्यन्त १९५ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ८३ जणांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे .११३ पॉझिटिव्ह रुग्णांवर सासवड व जेजुरी कोव्हिड केअर सेंटर मध्ये उपचार घेत आहेत. जेजुरी मध्ये पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने जेजुरी शहरात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड यांनी जेजुरी प्रतिबंधक क्षेत्र जाहीर केले आहे.
जेजुरी शहर कन्टेन्टमेन्ट क्षेत्र जाहीर केल्याने शहरात अत्यावश्यक सेवा वगळता जेजुरी बंद राहील. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर येऊ नये, स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्या, असे आवाहन जेजुरी पालिकेच्या मुख्याधिकारी पूनम शिंदे- कदम यांनी सांगितले.
COMMENTS