जिल्ह्यात नागपंचमी सणावर "कोरोना'चा फणा! :
यंदा नाही रंगली झिम्मा- फुगडी...नाही पतंग
संतोष भोसले
वडगाव निंबाळकर, प्रतिनिधी
कोरोनाच्या संकटामुळे नागपंचमीचा सण यंदा घरातच साजरा करण्याची वेळ महिला आणि मुलांवर आली आहे पतंग नाही... सुरपाट्या नाही... झिम्मा फुगडी नाही... एवढेच नव्हे तर नागोबाचे पूजनही घरातच करावे लागले.
बाहेर कोरोनाचे संकट आ... वासून उभे असल्यामुळे नागरिकांच्या मधुन दहशत पसरली आहे. नागपंचमी हा महिलांचा जिव्हाळ्याचा सण. घरोघरी हा सण नेहमीच उत्साहात साजरा केला जातो. नागाच्या प्रतिमेचे पूजन केले जाते. भारतीय संस्कृती, परंपरा समाजात रूजल्याने श्रावणातील व्रतवैकल्ये प्रमाणे नागपंचमी मनोभावे साजरी केला जाते. पण कोरोनाची धास्ती असल्याने नागपंचमीचा सण फक्त औपचारिकता म्हणून साजरी केली जात आहे. वडगाव निंबाळकर येथील पुरातन ऐतिहासिक असलेल्या नाग मंदिरात दरवर्षी दर्शनासाठी मोठी गर्दी होते यंदा गर्दी न करता फक्त विधीवत पूजा केली गेली. येथील महादेव मंदिराजवळ परंपरेप्रमाणे बजरंग जाधव यांच्या कुटूंबाने तयार केलेल्या मातीच्या नागमूर्ती चे पूजन साध्या पद्धतीने करण्यात आले. नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया, मुली एकत्र येत झोके खेळणे, झिम्मा-फुगडी, फेर धरणे असे खेळ खेळतात. मात्र दरवर्षीप्रमाणे नागपंचमीला घराघरांच्या अंगणात झिम्मा- फुगडीचे खेळ, सोशल डिस्टन्सिंग आणि संचारबंदीमुळे रंगले नाहीत. दरम्यान लहान मुलांनाही पतंग उडविण्याचा आनंद व्यक्त करता आला नाही. दुकान बंद असल्यामुळे पतंगांचे हौस झाली नाही. कोरोनाच्या संकटाबरोबर यंदा या दिवसातील वारे सुद्धा वाहिले नसल्यामुळे पतंगही डाऊन होते. पंचमीला नवविवाहिता आवर्जून माहेरी येतात. मात्र, यंदा संचारबंदीमुळे हा सण सासरीच साजरा करावा लागला आहे, तसेच सोशल डिस्टन्सिंग आणि संचारबंदीमुळे एकत्र येउन महिलांनी झिम्मा-फुगडीही खेळली नाही.
---------
COMMENTS