ग्रामसेवकांच्या मनमानी कारभाराला वैतागून सरपंच आणि सदस्यांनीच ठोकले वाणेवाडी ग्रामपंचायतीला टाळे
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाणेवाडी ग्रामपंचायत चे ग्रामसेवक पी के गाढवे यांच्या मनमानी कारभाराला वैतागून सरपंच आणि सदस्यांनीच आज ग्रामपंचायतीला टाळे ठोकले.
ग्रामसेवक गाढवे हे गेली दहा दिवसापासून ग्रामपंचायत कार्यालयात येत नाहीत. यामुळे गावाच्या विकासकामांना खीळ बसत आहे.यामुळे दि २८ सप्टेंबर रोजी बारामतीचे गटविकास अधिकारी यांना याबाबत निवेदन देण्यात आले होते. यामध्ये ग्रामसेवक हे मनमानी कारभार करत असून सदस्यांनी मागितलेली माहिती देत नाहीत, तसेच त्यांची सन २०१८ पासून आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करावी. अशी मागणी केली होती. यावर कोणताच तोडगा निघत नसल्याने याला वैतागून आज वाणेवाडी ग्रामपंचायत सदस्यानी ग्रामपंचायतीलाच टाळे ठोकले. यावेळी सदस्य आप्पासाहेब जगताप, शाफिक मुलाणी, सतीश कदम, सुनील चव्हाण तसेच सरपंच प्रतिनिधी किरण काकडे, सदस्य प्रतिनिधी हनुमंत जगताप, सचिन सावंत, अनिकेत चव्हाण, बाळासो जगताप, कुबेर चव्हाण, अमोल भोसले, अभिजित शिर्के उपस्थित होते.
गेल्या तीन वर्षांपासून सदस्यांना कोणतीही माहिती दिली जात नाही, वारंवार गैरहजर, ग्रामपंचायतला बाहेर बदनाम करणे, आर्थिक गैरव्यवहार चौकशी सुरू होऊनही चौकशी अधिकाऱ्यांना सहकार्य न करणे असे आरोप सदस्यांनी केले आहेत. दरम्यान याबाबत तीन दिवसात कोणताही निर्णय न झाल्यास ग्रामपंचायत समोरच उपोषणाला बसणार असल्याचे सदस्यांनी सांगितले
---------------------------------
वाणेवाडी आणि वाघळवाडी या दोन्ही ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार दोन्ही ग्रामविकास अधिकाऱ्यांचे बदल्यांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविले आहेत. बदल्यांबाबत अजून अहवाल प्राप्त झाला नाही. अहवाल येताच कार्यवाही केली जाईल.
राहुल काळभोर. गटविकास अधिकारी बारामती
COMMENTS