'सोमेश्वर' च्या सभासद व कामगारांची दिवाळी गोड करणार : पुरुषोत्तम जगताप
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर कारखाना गेल्या वर्षीच्या २०१९-२० या गळीत झालेल्या उसाच्या अंतिम बिलपोटी एफआरपी च्या तुलनेत राज्यातील इतर कारखान्यात आपण कुठेही कमी पडणार नसल्याचे सांगून यावर्षीची सभासद आणि कामगारांची दिवाळी गोड करणार असल्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी सांगितले.
आज (दि २५) सकाळी १० वाजता सोमेश्वर कारखान्याचा ५९ व्या गळीत हंगामातील गव्हाण पूजन व गळीत हंगाम शुभारंभ अध्यक्ष जगताप आणि संचालक मंडळाच्या हस्ते पार पडला. यावेळी बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी होळकर, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, संचालक
नामदेवराव शिंगटे, सुनील भगत, किशोर भोसले, विशाल गायकवाड, सचिन खलाटे, उत्तम धुमाळ, मोहन जगताप, ऋतुजा धुमाळ, हिराबाई वायळ, महेश काकडे, लक्ष्मण गोफणे, महेश राणे, लाला माळशिकारे, सिद्धार्थ गीते, दिलीप थोपटे, शांताराम कापरे, गणेश चांदगुडे तसेच सभासद व कामगार उपस्थित होते.
अध्यक्ष जगताप पुढे म्हणाले, चालू गळीत हंगामात ३३ हजार एकरातील जवळपास तेरा लाख टनांच्या आसपास ऊस गाळापासाठी उपलब्द असून १८० दिवस कारखाना चालला तर आपण ११ लाख टनांच्या आसपास उसाचे गाळप करू शकतो. उर्वरित एक ते दीड लाख टन ऊस संपवण्यासाठी संचालक मंडळाची इतर कारखान्यांशी चर्चा सुरू आहे. यावर्षी अतिरिक्त उसाचे संकट असले तरी यातून आपण निश्चित मार्ग काढू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच गेल्या वर्षीच्या हंगामातील पाच ते सव्वा पाच लाख टन साखर गोडाऊन मध्ये शिल्लक आहे. शिवाय चालू हंगामातील उत्पादित होणारी साखर यामुळे कारखानदारी पुढील अडचणीत भर पडणार आहे त्यासाठी बी हेवी मोलायसिस पासून इथेनॉल, अल्कोहोल बनवण्याचा संचालक मंडळाचा मानस असून यामुळे अतिरिक्त साखरेचे संकट कमी होण्यास मदत होईल.
चालू गळीत हंगामात ३१४ ट्रक टॅक्टर, ९३१ बैलगाडी, १८५ डंपिंग तर १२ हार्वेस्टरशी कारखान्याने करार केला असून ११ ऑक्टोबरलाच कारखाने सुरू करण्याचा संचालक मंडळाचा मानस होता मात्र परतीचा पाऊस आणि ऊसतोडणी कामगार आणि वाहतुकदारांचा संप यामुळे कारखाने सुरू करण्यास दसरा उजाडला. ऊसदराबाबत सोमेश्वर कारखान्याने २७८९ रुपये पूर्ण एफआरपी अदा करत एफआरपी पेक्षा टनाला १११ रुपये जादा दिले आहेत. लवकरच कारखान्याच्या ताळेबंद पूर्ण करून एफआरपी च्या तुलनेत राज्यातील इतर कारखान्याच्या बरीबरीने दर देणार असल्याचे सांगत सभासदांबरीबर कामगारांची देखील दिवाळी गोड करणार असल्याचे अध्यक्ष जगताप यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे आभार उपाध्यक्ष शैलेश रासकर यांनी मानले.
COMMENTS