सरकारी योजनेची वाट न पाहता पणदरे येथे सेवानिवृत्त जेष्ठांनी काय केले वाचा सविस्तर
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्यूज.------------
सांडपाण्याचा व आरोग्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सरकारी योजनांची वाट न पाहता स्वतःच भूमिगत गटार योजना राबवून सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याची सामाजिक बांधिलकी पणदरे (ता. बारामती) येथील पाच ज्येष्ठांनी उचलली आहे. पाचच जेष्ठ नागरिकांनी स्वतः तीन लाख रूपयांचा खर्च करत साडेतीनशे फूट लांबीचे भूमिगत गटार बनविले आहे. मंदिर, शाळा यासाठी लोकवर्गणीची प्रथा आहेच. परंतु आरोग्याच्या कारणासाठी वर्गणी काढून स्वच्छतेचा संदेश देण्याचे काम या कृतीतून ज्येष्ठांनी केले आहे.
पणदरे येथील विद्यालयाच्या पूर्व बाजूला औद्योगिक विकास महामंडळाच्या उपसा योजनेशेजारील वस्तीमध्ये सोडून दिलेल्या पाण्याचा साठा होत होता. या सांडपाण्यामुळे परीणामी कीटकांची वस्ती वाढून आरोग्याच्या व दुर्गंधीच्या समस्यांना सुरवात झाली होती. तेथील नागरिकांनी सरकारी योजनांची वाट पहात बसण्यापेक्षा आपल्या प्रश्नाची सोडवणूक करण्यास तातडीने प्राधान्य दिले. बारामतीचे निवृत्त गटशिक्षणाधिकारी किशोर पवार, सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक सुधाकर जगताप, सेवानिवृत्त कंडक्टर बबनराव जगताप, माजी सरपंच रमेश जगताप सेवानिवृत्त बांधकाम उपअभियंता दिलीप धुमाळ यांनी पुढाकार घेतला. पाच जणांनी एकत्र येत स्वखर्चाने भूमिगत गटाराची योजना आखली. वस्तीपासून डाव्या कालव्याच्या दिशेला साडेतीनशे फुटांची गटार योजना बनविली यासाठी तब्बल तीन लाख रूपये खर्च आला. या कृतीतून सेवानिवृत्त जेष्ठांनी व माजी सरपंच यांनी आपल्या कुटुंबाची व शेजारील कुटुंबांची काळजी व्यक्त केली आहे. तसेच शाळा, मंदिर यासोबत आरोग्यालाही महत्व दिले पाहिजे हा संदेश कृतीतून दिला आहे. याबाबत माजी गटशिक्षणाधिकारी किशोर पवार म्हणाले, सांडपाणी साठत असल्याचे पाहून त्यावर मार्ग काढला पाहिजे यासाठी सगळेजण एकत्र बसलो आणि थेट कृती करण्याचा निर्णय घेतला. अल्पावधित साडेतीनशे चारशे फुटांचे भूमिगत गटार झाले असून सांडपाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. आजूबाजूच्या सर्वच कुटुंबाच्या आरोग्यासाठी ही योजना उपयुक्त ठरेल.
COMMENTS