मराठी भाषा शेकडो वर्षे अनेक प्रवाह पोटात घेऊन चालणारी भाषा- संतोष शेंडकर : मराठी भाषा गौरवदिन
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
मु. सा. काकडे महाविद्यालय सोमेश्वरनगर, बारामती. येथे मराठी विभागाच्या वतीने कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्ताने जागतिक मराठी भाषा गौरवदिन प्रथमच दूरदृश्यप्रणाली पद्धतीने साजरा करण्यात आला.
यावेळी दूरदृश्यप्रणालीचा वापर करून कार्यक्रमासाठी भारत ज्ञान विज्ञान समुदायाचे माजी राज्य सचिव व पत्रकार संतोष शेंडकर मार्गदर्शक वक्ते म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. जवाहर चौधरी होते. कार्यक्रमाचे संयोजन मराठी विभाग प्रमुख डॉ. जया कदम यांनी केले होते.
संतोष शेंडकर यांनी 'भाषिक राजकारण' या विषयावर अतिशय अभ्यासपूर्ण, सहज-सुंदर, सोप्या शैलीत आणि सर्वसामान्यांच्या बोलीत मराठीच्या अस्तित्वाचा आणि भवितव्याचा वेध घेतला.
ते म्हणाले की, मराठी असूनही आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमात घालण्यासाठी अट्टाहास धरतात. आणि मराठीची चिंता करतात हा विरोधाभास आहे. 'खरेतर, आपली मराठी भाषा अतिशय सुंदर आहे, ती कधीही नष्ट होणार नाही. समाज माध्यमात भाषेचे स्वरूप बदलत आहे. ती शेकडो वर्षे अनेक प्रवाह पोटात घेऊन चालत आहे. नव्या प्रवाहातही ती बदलेल पण टिकून राहील. तिचा आपण आवर्जून वापर करु व तिला सर्वश्रेष्ठ ठरवू!' असा आशावाद व्यक्त करून त्यांनी स्वरचित कविताही सादर केली.
आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये प्राचार्य जवाहर चौधरी यांनी कुसुमाग्रजांच्या साहित्यिक योगदानाचे कौतुक करून 'लाभले आम्हास भाग्य...'ही कविता सादर केली. तसेच मातृभाषेतून शिक्षणाच्या संकल्पना नीट स्पष्ट होतात. त्यामुळे शिक्षणासाठी व राज्यकरभरासाठी मातृभाषेचा आग्रह धरला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले आणि मराठी विभागाच्या या उपक्रमाचे कौतुक केले. डॉ. जया कदम यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना म्हटले की, "२७ फेब्रुवारीला दरवर्षी 'मराठी राजभाषा दिन' साजरा केला जातो. मराठी भाषेचे गोडवे सांगणाऱ्या 'पोस्ट' एकमेकांना टाकल्या की, वर्षभराचं 'मराठी भाषेबद्दल प्रेम दर्शविण्याचं' काम होऊन जातं असा कित्येकांचा समज आहे. खरंतर उजाडणारा प्रत्येक दिवस हा मराठी भाषेचाच मानला गेला पाहिजे. आजच्या मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी भाषा टिकवण्याचा संकल्प केला पाहिजे. शासनाबरोबर मराठी भाषा टिकवणे आणि ती अधिकाधिक समृद्ध करणे ही आपलीही जबाबदारी आहे." डॉ. प्रवीण ताटे- देशमुख यांनी आभार मानले.
COMMENTS