सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
जंक्शन : प्रतिनिधी
तालुक्यात आज पहाटे दोन ठिकाणी दरोडा पडला. दागिन्यांसह रोख रक्कमही चोरट्यांनी लंपास केली आहे. दरोडेखोरांच्या हल्लात एक जण जखमी झाले आहेत.
इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये दरोडेखोरांनी धुमाकुळ घातला. दोन ठिकाणी दरोडे टाकून सुमारे दीड लाख रुपये रोख रक्कमेसह १५ तोळे सोन्याचे दागिने व चांदीचा ऐवज लंपास केला. दरोडेखोरांचा प्रतिकार करीत असताना कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र गायकवाड जखमी झाले.
सोमवारी (ता. २७) पहाटे दोनच्या सुमारास रत्नपुरी जवळील गायकवाड वस्ती येथील कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र गायकवाड यांच्या बंगल्यामध्ये सहा दरोडेखोरांनी घरचा दरवाजा कटावणीच्या साहय्याने तोडून प्रवेश केला. यावेळी गायकवाड त्यांच्या पत्नी सुनंदा, भाऊ राहुल व भावजय वैशालीसह घरामध्ये होते.
चोरट्यांनी राजेंद्र गायकवाड यांच्या बेडरुम प्रवेश करुन त्यांची पत्नी सुनंदा यांना धारधार शस्त्राचा धाक दाखवून कपाटील रोख रक्कम, सोने-चांदीचे दागिने व अंगावरील दागिने काढून देण्यास सांगितले. दागिने काढत असताना आम्हाला मारहाण करु नका असे सांगत असताना अचानक राजेंद्र गायकवाड यांना जाग आल्याने त्यांना लाकडी काठीने मारहाण केली. गायकवाड यांनी प्रतिकार करण्यास सुरवात केल्यानंतर त्यांना धारधार शस्त्राने कपाळावर मारहाण केली. त्यांच्या कपाळाला मोठी जखम झाली असून सहा टाके पडले आहेत.
राजेंद्र गायकवाड व सुनंदा गायकवाड यांनी घरामध्ये कोंडून वरच्या मजल्यावर चोरी करण्याचा चोरट्यांचा डाव होता. मात्र गायकवाड यांनी दरवाजा ओढून धरला. चोरटे वरच्या मजल्यावर जात असताना राहुल गायकवाड व त्यांच्या पत्नी वैशाली यांनी वरुन पाण्याची स्टीलची बाटली फेकुन मारली. आजुबाजुचे नागरिकांना जाग आल्याने चोरट्यांनी सुमारे दीड लाख रुपये रोख रक्कम व सुमारे ११ तोळे सोन्याचे दागिने व चांदीचा ऐवज घेवून पळ काढला.
COMMENTS