सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाणेवाडी (ता. बारामती) येथील रामराजे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या वतीने अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाळकृष्ण सर्जेराव भापकर यांना 'रामराजे जगताप स्मृतीगौरव पुरस्कार' जाहीर करण्यात आला आहे.
बारामती तालुक्याचे पहिले सभापती व सोमेश्वर साखर कारखान्याचे संस्थापक-संचालक स्व. रामराजे जगताप यांच्या स्मृतिनिमित्त कारखाना कार्यक्षेत्रात उल्लेखनिय सामाजिक योगदान देणाऱ्या व्यक्तिस दरवर्षी रामराजे स्मृतिगौरव पुरस्कार देऊन गौरविले जाते. भापकर हे तरडोली (ता. बारामती) गावचे रहिवाशी आहेत. न्यू इंग्लिश स्कूल लोणीभापकर व जेजुरी या विद्यालयांचे संस्थापक-मुख्याध्यापक होते. मागील छत्तीस वर्ष ते तर्कतिर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी व डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या विचाराने अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे काम करत आहेत. सध्या ते अनिसचे जिल्हा उपाध्यक्ष असून अनेक मुले, व्यक्ति यांना भोंदूबाबांच्या तावडीतून सोडविले आहे. नुकतेच देवाला सोडलेल्या मुलाला परत आणण्यात आणि एका मुलीस भोंदूबाबाच्या तावडीतून सोडविण्यात त्यांना यश मिळाले. पाटस येथील टोमॅटोचा रस पाजून उपचार करणाऱ्या बाबाचा पर्दाफाश करण्यात आणि तत्कालिन पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांच्याविरोधात प्लँचेटची तक्रार करण्यात त्यांचा पुढाकार होता. आजूबाजूच्या चार तालुक्यातील प्रत्येक शाळेत त्यांनी विद्यार्थी प्रबोधनाचे कार्यक्रम केले आहेत. या कामादरम्यान त्यांचा अपघात होऊन पुनर्जिवन मिळाले आहे. सध्या ते अनिसमार्फत गावोगावी, शाळांमध्ये ग्रंथदिंडी घेऊन जाण्याचे काम करत आहेत. यामुळे त्यांच्या कामाला पुरस्कार देऊन सलाम करत असल्याचे, सोसायटीचे संस्थापक पुरूषोत्तम जगताप व अध्यक्ष बाळासाहेब जगताप यांनी सांगितले.
--
COMMENTS