सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोरटेवाडी (ता. बारामती) येथील केंजळे परिवाराच्या चौथ्या पिढीने संत सोपानकाका पालखी सोहळ्यासाठी स्वमालकीची बैलजोडी पाठविण्याची परंपरा जपली आहे. शनिवारी (दि. १८) रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करून बैलजोडी सासवडकडे पाठविण्यात आली. संत सोपानकाका पालखीचा रथ ओढण्याचा मान सुमारे १२५ वर्षांपासून या परिवाराला मिळत आहे. पंढरपूर एकादशीला पादुकांना स्नान घालणे आणि पालखी सोरटेवाडीत आल्यानंतर महाअभिषेक करणे, याचाही मान केंजळे परीवाराला आहे. सोरटेवाडी येथील केंजळे वाड्यात मान्यवरांच्या व ग्रामस्थांच्या उपस्थितीत बैलजोडीची विधीवत पुजा करण्यात आली. यावेळी सोहळा प्रमुख त्रिभुवन महाराज गोसावी उपस्थित होते. गेल्या वर्षी कोरोना पार्श्वभूमीवर पालखी सोहळा रद्द झाला होता. मात्र परंपरेला खंड पडू न देता बैलजोडीचे केंजळेवाड्यात पूजन करून बैलजोडी पुन्हा वाड्यात बांधण्यात आली होती.
शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतिश काकडे, बांधकाम सभापती प्रमोद काकडे, जिल्हा बॅंकेचे संचालक संभाजी होळकर, सोमेश्वरचे संचालक संग्राम सोरटे, ऋषीकेश गायकवाड, सरपंच दत्तात्रय शेंडकर, वैभव गायकवाड, विजयकुमार सोरटे, मधुकर सोरटे तसेच केंजळे परीवारातील नितीन कुलकर्णी, विकास केंजळे, संजय कुलकर्णी, अनिल बडवे, अरुंधती केंजळे, रागिणी कुलकर्णी, माधवी केंजळे व ग्रामस्थ उपस्थित होते.
संत सोपानकाका पालखी सोहळा शनिवारी
(दि.२५) रोजी सासवडवरून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. पालखी रथासाठी एक आणि नगारा वाहून नेण्यासाठी येथील नितीन कुलकर्णी आणि विकास केंजळे यांनी होळ(ता. बारामती) येथील होळकर कुटूंबाची दोन बैलजोडी सुमारे ३ लाख रुपयांना खरेदी केली आहे. सुमारे १२५ वर्षांपूर्वी सोपानकाका पालखी सोहळा आकारास आला. सुरुवातीला भोई समाजातील लोक पालखी वाहून नेत असत. काही वर्षांनी बैलांच्या साहाय्याने पालखी ओढून नेता येईल, असा रथ तयार करण्यात आला. सोरटेवाडी येथील कै. बापूसाहेब बाळाजी केंजळे सोपानकाकांच्या समाधीचे सेवेकरी होते. त्यांच्याकडे सुरुवातीला हा मान होता. त्यानंतर त्यांच्या चौथ्या पीढीने ही परंपरा सुरु ठेवली आहे.
COMMENTS