सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
पुणे-सातारा महामार्गावरून सारोळे ता.भोर मार्गे कुटुंबासह काळूबाई दर्शनाला निघाले असताना रस्ता ओलांडताना झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार दि. २९ अकराच्या सुमारास घडली.उत्तम झेंडे वय-५५ रा.वडकी ता. हवेली असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार झेंडे कुटुंबीय काळूबाई दर्शनासाठी वाई बाजूने जाण्यासाठी चार चाकी वाहनांसह निघाले असताना पुणे-सातारा महामार्गावर सारोळे गावच्या हद्दीतील हॉटेल मल्हार समोर त्यातील एका गाडीचा टायर पंक्चर झाला. यावेळी मृत उत्तम झेंडे हे दुसऱ्या गाडीत पुढे निघून गेले होते. टायर पंक्चर झाल्याचा फोन येताच ते गाडीसह पुन्हा वळून आले. रस्ता ओलांडून पलीकडे असलेल्या गाडीकडे जाताना साताऱ्याकडून पुण्याच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या ट्रकने (के.ए.२२ ए.ए.४३६३) त्यांना जोराची धडक दिली.यात झेंडे यांचा जागीच मृत्यू झाला.झेंडे कुटुंबीयांसमोर झालेल्या या अपघाताने एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच राजगड पोलीस, महामार्ग पोलीस व आर. टी. ओ. अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. राजगड पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी भोर उपविभागीय रुग्णालयात पाठवला आहे. पुढील तपास राजगड पोलिस करीत आहेत.