khandala News l शिरवळ पोलिसांच्या गाडीचे स्टेअरिंग खाजगी व्यक्तीच्या हातात..! खासगी वाहनावर देखील लावला जातोय अंबर दिवा ?

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
लोणंद : प्रशांत ढावरे
खंडाळा तालुक्यातील एक मोठे पोलीस ठाणे असलेल्या शिरवळ पोलीस ठाण्याच्या ताफ्यातील शासकीय मालमत्ता असलेल्या पोलीस जीपवर बरेचदा एक खाजगी इसम सारथ्य करताना दिसत असल्याने शिरवळकरांना प्रश्न पडलाय की पोलीस चालक असतानाही कोणाच्या वरदहस्ताने खाजगी चालकाच्या हातात पोलीस गाडीचे स्टेअरिंग दिले जातेय ?
           याबाबत खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिरवळ पोलिसांच्या ताफ्यात असलेल्या एमएच ११ डिएन ३२२९ या शासकीय वाहनावर चक्क खासगी वाहनचालक सारथ्य करत असल्याचा धक्कादायक प्रकार चालू आहे. तसेच सदर इसमाची खासगी गाडी क्रमांक एमएच ०४ ईएस ६९६३ शिरवळ पोलीसांकडे एमआयडीसी परिसरात पेट्रोलींगसाठी अधिग्रहित असते. या गाडीचा खर्च शिरवळ परिसरातील काही कंपन्यांकडून केला जात असल्याचे समजत आहे. सदर इसम आपल्या या खासगी वाहनावर अनेकदा अंबर दिवा लावून रूबाब दाखवत फिरताना शिरवळकर परिसरातील अनेकांनी पाहीले आहे. 

आपल्या खासगी ऑडी गाडीवर अंबर दिवा लावलेल्या पूजा खेडकर यांचे ताजे प्रकरण अवघ्या महाराष्ट्रात गाजलेले असताना, अंबर दिव्याबाबत कडक नियम असतानाही सहजासहजी अंबर दिवा कसा उपलब्ध होतो ? त्याला अंबरदिवा कोणी उपलब्ध करून दिला? याबाबत संबंधितांवर ठोस कारवाई होणार का ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

दरम्यान याबाबत शिरवळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सदर इसमास यापुढे 'अंबर दिवा' गाडीमधे पोलीस असतानाच लावण्यात येइल अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्याचे सांगितले आहे. तसेच पोलिस गाडी नादुरुस्त असताना सदर इसमास पोलीसांपेक्षा गाड्यांची अधिक माहीती असल्याने लांबच्या तपासावेळी सोबत नेले असल्याचे सांगितले.
To Top