सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : महेश जगताप
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने लागण हंगाम सन २०२५-२६ साठी पाडेगाव ऊस संशोधन केंद्र व वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांच्या सल्ल्याने ऊस लागण धोरण जाहीर केले आहे. आडसाली लागण हंगाम १ जुलैपासून सुरू होणार आहे. दोन जुलै ते ३ जुलै पर्यंत लागण नोंदी बंद राहणार आहेत. ४ ते १४ जुलै पर्यंत लागण नोंदी ज्या त्या तारखेस घेणे चालू राहील. १५ जुलै पर्यंत लागण नोंदी जास्त आल्यास त्याचा ड्रॉ काढण्यात येणार आहे. तर पूर्व-हंगामी सप्टेंबर ते २९ नोव्हेंबर , सुरू हंगाम १ डिसेंबर ते २८ फेब्रुवारी दरम्यान होईल. याबाबत सोमेश्वर कारखान्याने प्रसिध्दपत्रक प्रसिद्धीस दिले आहे.
आडसाली हंगामासाठी को-८६०३२, व्हीएसआय ९८०५ कोएम ०२६५ या ऊसजातींसाठी १ जुलै १४ ऑगस्टदरम्यान परवानगी देण्यात आली आहे. पूर्वहंगामी ऊस लागणीकरिता को-८६०३२, व्हीएसआय ९८०५, कोएम ०२६५, व्हीएसआय १०००१, फुले १५०१२, फुले १३००७, व्हीएसआय ०८००५ या ऊसजातींसाठी १ सप्टेंबर ते २९ नोव्हेंबर दरम्यान परवानगी दिली आहे. एमएस १०००१, को ८६०३२, व्हीएसआय ०८००५, व्हीएसआय ९८०५, फुले १५०१२, फुले १३००७, कोएम ०२६५ या ऊसजातीसाठी १ डिसेंबर ते २८ फेब्रुवारी दरम्यान सुरू लागवडीसाठी परवानगी देण्यात आली आहे. हंगाम संपेपर्यंत तुटलेल्या सर्व जातींच्या खोडवा उसाच्या नोंदी घेण्यात येणार आहेत. रोप लागण ज्या दिवशी शेतात केली जाईल त्या दिवशीचीच लागण तारीख नोंद घेतली जाईल. रोप लागणीस प्राधान्याने तोड देण्यात येणार आहे. सभासदांनी त्यांच्या एकूण ऊस लागण क्षेत्रापैकी आडसाली ४० टक्के, पूर्व हंगामी १५ टक्के, सुरू १० टक्के आणि खोडवा ३५ टक्के या प्रमाणात ऊस लागण्याचे नियोजन करण्याचे आवाहन कारखान्याच्या वतीने करण्यात आले आहे.
सोमेश्वर'च्या कार्यक्षेत्रातील सर्व सभासदांनी उसाची लागण ४.५ फूट किंवा ५ फूट पट्टा पद्धतीने करावी, त्यामुळे प्रतिएकरी ऊस उत्पादनात वाढ होईल. पट्टा पद्धतीने लागवड केल्यामुळे उसावरील कीड व रोग नियंत्रित करणे सोपे जाते. हार्वेस्टरने तोडणीकरिता पट्टा पद्धतीने लागण करून हार्वेस्टरद्वारे ऊसतोडणीला प्राधान्य देण्यात येत असल्याने सर्व सभासदांनी रुंद सरी अथवा पट्टा पद्धतीचा अवलंब करावा. लागण तारखेनुसार ऊसतोडीसाठी आडसाली हंगामातील सर्व ऊस जातींच्या रोपांस प्राधान्याने तोड देण्यात येणार आहे. सभासदांनी आडसाली ऊस सरसकट कापून काढल्याचे निदर्शनास आल्यास त्या उसाची लागण तारीख रद्द होईल व सभासदांना त्या उसाची लागण तारीख पुन्हा नव्याने देणे बंधनकारक राहील. उसाची नव्याने दिलेली नोंद खोडवा म्हणून घेण्यात येईल. अशा खोडव्यास कोणत्याही प्रकारचे अनुदान लागू होणार नाही. सभासदांनी ऊसनोंद बोगस केल्यास पाचशे रुपये ऊस बिलातून वसूल केले जाणार आहेत.
-------------------
हार्वेस्टर ऊस तोडणी करण्याकरता प्राधान्य देण्यात आले आहे. सभासदांनी शेतात किमान साडेचार फूट अंतर ठेवून ऊस लागवड करावी. सोमेश्वर कारखाना यांत्रिकीकरणाला प्राधान्य देत असून हार्वेस्टर मार्फत ऊस तोडणी झाल्यास प्रति टन ५० रुपये अनुदान देण्याचा निर्णय सोमेश्वर कारखान्याने घेतला आहे. सभासदांनी कारखान्याकडे नोंदलेला ऊस संमतीशिवाय इतर कारखान्यास देऊ नये. अन्यथा साखर, ऊस रोपे, ऊस बियाणे, ताग, सोयाबीन बियाणे, कंपोस्ट खत आदी सवलती बंद करण्यात येणार आहेत.
पुरुषोत्तम जगताप : अध्यक्ष सोमेश्वर सहकारी साखर कारखाना