Pune Breaking l गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन एकाच कुटुंबातील चौघे जखमी : हडपसर परिसरातील महंमदवाडी येथील घटना

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
हडपसर : प्रतिनिधी
स्वयंपाकाच्या सिलिंडरचा स्फोट होऊन एकाच कुटुंबातील चौघे जण जखमी झाल्याची घटना हडपसर भागातील महंमदवाडीत घडली. जखमी दाम्पत्यासह त्यांच्या मुलांवर ससून रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
              टेकचंदसिंग चौहान (४२), बेबी टेकचंदसिंग चौहान (३८), कशिश टेकचंदसिंग चौहान (१८) आणि निखिल टेकचंदसिंग चौव्हाण (१५) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौहान कुटुंब मूळचे उत्तर प्रदेशमधील आहे. ते आठ दिवसांपूर्वी पुण्यात आले आहे. महमंदवाडी रस्त्यावरील वाडकर मळा भागात अजय परदेशी यांची खोली भाड्याने ते राहत होते. कामाच्या शोधात चौहान कुटुंबीय पुण्यात आले होते.
          चौहान कुटुंबीय गाढ झोपेत होते. बुधवारी (दि. २८) पहाटे पाचच्या सुमारास सिलिंडरमधून गळती सुरू झाली आणि स्फोट झाला. स्फोटाच्या हादऱ्यात खिडकीच्या काचा फुटल्या, तसेच स्फोटानंतर लागलेल्या आगीत टेबल आणि कपडे जळाली. स्फोटात चौहान कुटुंबीय होरपळले. स्फोटाचा आवाज झाल्यानंतर शेजाऱ्यांनी धाव घेतली. अग्निशमन दल, तसेच काळेपडळ पोलिसांना या घटनेची माहिती कळवण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. स्फोटात जखमी झालेल्या चौहान कुटुंबीयांना सुरुवातीला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.
To Top