Someshwar sugar factory l 'सोमेश्वर'कडे नोंदवलेला ऊस इतर कारखान्याला दिला तर...! संचालक मंडळाने घेतला मोठा निर्णय

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : महेश जगताप
सभासदांनी कारखान्याकडे नोंदलेला ऊस संमतीशिवाय इतर कारखान्यास देऊ नये. अन्यथा साखर, ऊस रोपे, ऊस बियाणे, ताग,  सोयाबीन बियाणे, कंपोस्ट खत आदी सवलती बंद करण्यात येणार असल्याचा निर्णय सोमेश्वर साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने घेतला आहे. 
        चालू हंगामात हार्वेस्टरने उसतोडसणी करण्याकरता कारखाना प्राधान्य देण्यात आले आहे. सभासदांनी शेतात किमान साडेचार फूट अंतर ठेवून ऊस लागवड करावी. सोमेश्वर कारखाना यांत्रिकीकरणाला प्राधान्य देत असून हार्वेस्टर मार्फत ऊस तोडणी झाल्यास प्रति टन ५० रुपये अनुदान देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. येणाऱ्या उसलागवड हंगामात रोप लागणीस प्राधान्याने तोड देण्यात येणार आहे. सभासदांनी त्यांच्या एकूण ऊस लागण क्षेत्रापैकी आडसाली ४० टक्के,  पूर्व हंगामी १५ टक्के, सुरू १० टक्के आणि खोडवा ३५ टक्के या प्रमाणात ऊस लागण्याचे नियोजन करण्याचे आवाहन कारखान्याच्या वतीने करण्यात आले आहे. 
              सोमेश्वर'च्या कार्यक्षेत्रातील सर्व सभासदांनी उसाची लागण ४.५ फूट किंवा ५ फूट पट्टा पद्धतीने करावी, त्यामुळे प्रतिएकरी ऊस उत्पादनात वाढ होईल. पट्टा पद्धतीने लागवड केल्यामुळे उसावरील कीड व रोग नियंत्रित करणे सोपे जाते. हार्वेस्टरने तोडणीकरिता पट्टा पद्धतीने लागण करून हार्वेस्टरद्वारे ऊसतोडणीला प्राधान्य देण्यात येत असल्याने सर्व सभासदांनी रुंद सरी अथवा पट्टा पद्धतीचा अवलंब करावा. लागण तारखेनुसार ऊसतोडीसाठी आडसाली हंगामातील सर्व ऊस जातींच्या रोपांस प्राधान्याने तोड देण्यात येणार आहे. सभासदांनी आडसाली ऊस सरसकट कापून काढल्याचे निदर्शनास आल्यास त्या उसाची लागण तारीख रद्द होईल व सभासदांना त्या उसाची लागण तारीख पुन्हा नव्याने देणे बंधनकारक राहील. उसाची नव्याने दिलेली नोंद खोडवा म्हणून घेण्यात येईल. अशा खोडव्यास कोणत्याही प्रकारचे अनुदान लागू होणार नाही. सभासदांनी ऊसनोंद बोगस केल्यास पाचशे रुपये ऊस बिलातून वसूल केले जाणार आहेत.
To Top