सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नवी मुंबई : गणेश धनावडे
मुंब्राहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या फास्ट लोकलमधून प्रवास करणारे प्रवासी ट्रॅकवर पडल्याची घटना समोर आली आहे. 10 ते 12 प्रवासी ट्रॅकवर पडल्याची प्राथमिक माहिती आहे. अधिक प्रमाणात गर्दी असल्याने प्रवासी दरवाजावर लटकून प्रवास करत होते, त्यामुळे ही घटना घटल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
घटनेनंतरचे काही व्हिडीओ समोर आले आहेत, त्यामध्ये दिसत आहे की काही प्रवाशी मुंब्रा रेल्वे प्लॅटफॉर्म आणि रेल्वे ट्रॅकवर पडलेले आहेत. मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्निल नीला यांनी याबाबत सांगितलं की, घटनेची अद्याप सविस्तर माहिती समोर आलेली नाही. मात्र मदतीसाठी रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत.
कसा घडला अपघात?
कसारा येथून सीएसएमटीच्या दिशेने जाणारी लोकल मुंब्र्याजवळ आली त्यावेळी बाजूने पुष्कर एक्सप्रेस वेगाने बाजून गेली. त्यावेळी लोकल ट्रेनमध्ये दरवाजात लटकलेले प्रवाशी एक्सप्रेसला घासले. यातून अनेकजण ट्रॅकवर पडून ही दुर्घटना घडली.