Jawali News l ओंकार साखरे l मेढा नगरपंचायतीचा भोंगळ कारभार : अधिकाऱ्यांच्या सुचनांना कर्मचाऱ्यांचा कोलदांडा... नागरीकांच्या सुविधांकडे दुर्लक्ष

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मेढा : ओंकार साखरे
नेहमीच स्वच्छतेचे पुरस्कार घेण्यासाठी बोगसगिरी करणारे कर्मचारी अधिकाऱ्यांच्या सुचनांना कोलदांडा दाखवत आपलीच मनमानी करताना नागरीकांच्या सुविधांकडे दुर्लक्ष करीत असल्याने नगरपंचायतीच्या भोंगळ कारभाराला जनता वैतागली असून पावसाळा सुरू होवुनसुद्धा गटर स्वच्छतेची कामे मार्गी न लावल्याने गटरचे पाणी रस्त्याने वाहत असल्याचे दिसून येत आहे. सगळीकडे दुर्गंधी पसरून अस्वच्छतेच्या माहेरघरात रोगराई पसरण्याची चिन्हे असून नगरपंचायतीने वेळीत दक्षता घ्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
              मेढा नगर पंचायत हि राज्यात सर्वात लहान नगरपंचायत म्हणून गणली जाते. गत कित्येक वर्ष नगरसेवक नसल्याने कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. मुख्याधिकारी यांच्या निदर्शनास अनेक वेळा सुविधांच्या बाबतीत चर्चा होवून कर्मचाऱ्यांना केलेल्या सुचनांचे पालन होताना दिसत नाही. मुख्याधिकारी यांच्या आदेशाला कर्मचाऱ्यांकडून केराची टोपली दाखवली जात आहे. 
           या वर्षी पावसाळा लवकर सुरू झाल्याने स्वच्छता विभागाला गटरे स्वच्छ करण्यास वेळ मिळाला नाही कि गटरे स्वच्छ असल्याचा आभास झाला हेच जनतेला कळत नाही. पावसाच्या पाण्याने रस्ते साफ होत असल्याचे समजून स्वच्छता कर्मचारी स्वच्छतेकडे दुर्लक्ष करीत आहेत.
            सध्या गांधीनगर येथिल बंदिस्त गटर मधून पाणी वाहण्या ऐवजी ते रस्त्याने वाहताना दिसून येत असल्याने रस्ते उखडले जात आहेत. रस्त्यावर माती, खडी, घाण येवुन घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. गटर मोकळे पडले असून रस्त्याने पाणी वाहत असल्याने लोकांना ओढयातून चालतोय की काय अशी शंका वाटत आहे. 
             सातारा महाबळेश्वर रोड वरून गांधीनगर कडे जाणाऱ्या रस्त्यावर पुसेगावकरांच्या घरा समोर चिखलाचे साम्राज्य पसरले असून वाहण धारकांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहेत. याठिकाणी अनेक वाहनधारक घसरून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. 
             गटरांची अस्वच्छता , लोटणारांचे दुर्लक्ष यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण होत असून त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. पिण्याच्या पाण्याची टाकी कित्येक महिने धुतली जात नसून त्याकडेही नगरपंचायत लक्ष देताना दिसून येत नाही. 
            नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांनी कामचुकार कर्मचाऱ्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. 
To Top