Khandala Breaking l कंटेनरने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील चुलता-पुतण्या ठार : लोणंद-शिरवळ रस्त्यावरील घटना

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
शिरवळ : प्रतिनिधी 
शिरवळ-लोणंद रस्त्यावरील भोळी ता.खंडाळा येथील एसटी थांब्याजवळ कंटेनरने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत अमोल रघुनाथ चव्हाण(वय ४०) व धनंजय बबनराव चव्हाण(वय ५६ दोघे रा.भोळी ता.खंडाळा) या पुतण्या-चुलत्याचा मृत्यू झाला आहे.या घटनेने खळबळ उडाली असून अपघातानंतर शिरवळ-लोणंद रस्त्याच्या कामावरून भोळी ग्रामस्थांनी सोमवार दि.२ जून रोजी रास्ता रोको करण्याचा इशारा शिरवळ पोलीसांना निवेदनाद्वारे दिला आहे.त्यामुळे लोणंद-शिरवळ रस्त्याच्या कामावरून संघर्ष निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  
  भोळी ता.खंडाळा येथील अमोल चव्हाण व धनंजय चव्हाण हे दोघे शिरवळ येथील एका हॉलमध्ये नातेवाईकाच्या साखरपुडा कार्यक्रमासाठी शनिवार दि.३१ मे रोजी दुचाकी (क्रं.एमएच-११-सीएक्स-११६५) ने आले होते.यावेळी साखरपुडा कार्यक्रम संपल्यानंतर अमोल चव्हाण व धनंजय चव्हाण हे दोघे शिरवळहून भोळीकडे दुचाकीवरून येत असताना सायंकाळी ४ वाजण्याच्या दरम्यान भोळी ता.खंडाळा गावच्या हद्दीमध्ये असणाऱ्या एसटी बस थांब्याजवळ पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या कंटेनर(क्रं.-केए-५१-एएच-६५८२)ने दुचाकीला जोरदार धडक दिली.हि धडक एवढी जोरदार होती कि धडकेत दुचाकीवरील अमोल चव्हाण व धनंजय चव्हाण हे गंभीर जखमी झाले.यावेळी अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी तत्काळ शिरवळ पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी व शिरवळ रेस्क्यू टीमचे सदस्य दाखल झाले.यावेळी अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या अमोल चव्हाण व धनंजय चव्हाण यांना शिरवळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता अमोल चव्हाण यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले तर गंभीर जखमी झालेल्या धनंजय चव्हाण यांचा उपचारादरम्यान रविवार दि.१ जून रोजी मध्यरात्री ४ वाजण्याच्या दरम्यान मृत्यू झाला.यावेळी अमोल चव्हाण व धनंजय चव्हाण यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात येऊन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.या घटनेची रोहन चव्हाण याने शिरवळ पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून कंटेनरचालक गौरव विजय ढोरे(वय २२,रा.गडकुमली ता.साकोली जि.भंडारा)याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा पोलीस अंमलदार सुरेश मोरे हे अधिक तपास करीत आहे.
To Top