Pune News l मुलाचा खून करणाऱ्या बापाला न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा : पुरंदर तालुक्यातील वीर येथे घडली होती घटना

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुणे : प्रतिनिधी
कुऱ्हाड डोक्यात घालून मुलाचा खून करणाऱ्या वडिलांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जन्मठेप आणि १ हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.आय. पेरमपल्ली यांनी सुनावली.
          दशरथ चिमाजी जमदाडे (वय ६५, रा. माळवाडी वीर, ता. पुरंदर) असे जन्मठेप झालेल्या वडिलांचे नाव आहे. गणेश (वय ३२) याच्या खून प्रकरणी त्याचा चुलत भाऊ योगेश जमदाडे याने सासवड पोलिसात फिर्याद दिली आहे. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील प्रदीप गेहलोत यांनी काम पाहिले. त्यांना जिल्हा न्यायालय पैरवी अधिकारी पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, सत्र न्यायालय पैरवी अंमलदार पोलीस उपनिरीक्षक विद्याधर निचित, न्यायालय पैरवी अंमलदार सहायक पोलीस उपनिरीक्षक जयसिंग जाधव यांनी न्यायालयीन कामकाजासाठी मदत केली. ही घटना १५ जानेवारी २०१९ रोजी त्यांच्या राहत्या घरात घडली. दशरथ याने कोणत्या तरी कारणाने डोक्यात, डाव्या कानावर कुऱ्हाडीने वार करून मुलगा गणेश याचा खून केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी सासवड पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
To Top