सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यातील अंतर्गत कामे प्रगतीपथावर असुन गतवर्षीप्रमाणेच हंगाम यशस्वी पार पडेल असा विश्वास सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी व्यक्त केला.
सोमेश्वर कारखान्याचा रोलर पुजन सभारंभ सोमवार (दि.३०) रोजी कारखान्याचे उपाध्यक्ष मिलींद कांबळे व संचालक अभिजीत काकडे यांच्या हस्ते व कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी जगताप बोलत होते.
पुरुषोत्तम जगताप म्हणाले की, येणा-या हंगामासाठी तोडणी वाहतुक यंत्रणेचे करारही पुर्ण झाले असुन आजपर्यंत ११२० बैलगाडी, ६०० डंपिग, २० ट्रक, ३७० ट्रॅक्टर, ३० हार्वेस्ट्रचे करार पुर्ण झाले असुन पहिल्या हप्त्याचेही वाटप केलेले आहे. येणा-या हंगामासाठी शेतकी विभागाकडे एकुण ३५ हजार ५१२ एकर ऊसक्षेत्राची नोंद झाली असुन यात आडसाली १४४९२ एकर, पुर्वहंगामी ७९१६ एकर, सुरु ४१३२ एकर, खोडवा ८९७२ एकर नोंद कारखान्याकडे झाली आहे. या नोंद झालेल्या क्षेत्रातुन अंदाजे १२ ते १२.५० लाख मे.टन ऊस आपणास गाळपास उपलब्ध होईल. कारखान्याच्या शेतकी विभागाने हार्वेस्ट्ररने ऊसतोड होणेकरीता सभासद शेतक-यांनी पट्टा पद्धतीचा अवलंब करावा या केलेल्या आवाहनास सभासद शेतक-यांनी सहकार्य करुन जास्तीत जास्त पट्टा पद्धत अवलंबवावी.
यावेळी संचालक सुनिल भगत, शैलेश रासकर, बाळासाहेब कामथे, संग्राम सोरटे, ऋषीकेश गायकवाड, किसन तांबे, अजय कदम, हरीभाऊ भोंडवे, तुषार माहुरकर, जितेंद्र निगडे, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, वर्क्स मॅनेजर एन.एच. नायकोडे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
----------------------
सोमेश्वर कारखान्याकडे येणाऱ्या गाळप हंगामासाठी ३५ हजार ५१२ एकर उसाची नोंद झाली आहे. नोंद झालेल्या क्षेत्रातून बारा ते साडेबारा लाख टन उसाचे गाळप वेळेत करण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील आहे. सभासद, अधिकारी, कर्मचारी, ऊसतोडणी वाहतूक तंत्रणा यांच्या सहकाऱ्याने येणारा हंगाम यशस्वी पार पाडू.
पुरुषोत्तम जगताप - अध्यक्ष सोमेश्वर कारखाना.