सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण येथील पोलीस हवालदारावर लाच मागणी केल्याप्रकरणी लाच लुचपत विभागाने कारवाई केली आहे. संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाबतक्रारदार महिलेच्या मुलाविरुद्ध वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी तसेच जामीन मिळवून देणे आणि चार्जशीट लवकर दाखल करण्यासाठी आरोपी पोलीस हवालदार रमेश लक्ष्मण नागटिळक (वय 42) याने लाचेची मागणी केल्याची तक्रार अॅन्टी करप्शन ब्युरोकडे प्राप्त झाली होती. तक्रारीच्या अनुषंगाने दि. 18 जानेवारी रोजी लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. पडताळणीदरम्यान सुरुवातीस मागितलेली 30 हजारांची रक्कम तडजोडीनंतर 25 हजारांवर ठरवण्यात आल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर एसीबीने पुढील कारवाई करत आरोपी लोकसेवकास ताब्यात घेतले. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजीत पाटील व अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अॅन्टी करप्शन ब्युरो, पुणे विभागाने केली. दरम्यान, कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी शासकीय कामासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाच मागत असल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
