Baramati News l क्षणात दाखवले धाडस....! निरा डावा कालव्यात वाहून जाणाऱ्या ५५ वर्षीय महिलेला युवकांनी दिले जीवनदान

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
निरा डावा कालव्यात निंबूत छप्री येथील पुलाच्या ठिकाणी एक थरारक घटना घडली. पाय घसरल्याने एक महिला थेट कालव्याच्या पाण्यात पडली आणि पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहत जाऊ लागली. घटनेच्या क्षणी परिसरात घबराट निर्माण झाली होती. महिलेला वाचवण्यासाठी कोणी पुढे येईल का, असा प्रश्न उपस्थित होत असतानाच वाघळवाडी येथील दोन युवक देवदूत ठरले.ही घटना आज सायंकाली पाचच्या दरम्यान घडली.
         वाघळवाडी येथील हर्षद सुनील यादव आणि संकेत बाळासो मांगडे हे युवक निरेच्या दिशेने दुचाकीवरून जात असताना त्यांना ही घटना दिसली. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून त्यांनी क्षणाचाही विलंब न करता रस्ता कडेला गाडी थांबवली. कोणत्याही प्रकारची सुरक्षासाधने नसताना, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दोघांनी थेट कालव्यात उडी घेतली.
          पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान असल्याने महिलेला पकडणे अवघड जात होते. मात्र दोन्ही युवकांनी एकमेकांना साथ देत महिलेला सावरले व कडेला आणून सुरक्षितपणे बाहेर काढले. या वेळी उपस्थित नागरिकांनीही मदतीला धाव घेतली. सुदैवाने ती महिला सुखरूप असून मोठा अनर्थ टळला.
          या घटनेमुळे परिसरात काही काळ चिंताजनक वातावरण  झाले होते. मात्र युवकांच्या धाडसी कृतीमुळे परिस्थिती नियंत्रणात आली. हर्षद यादव आणि संकेत मांगडे यांच्या प्रसंगावधानामुळे एका कुटुंबाचे मोठे दुःख टळले आहे. त्यांच्या या धैर्यशील कृतीचे सर्वत्र कौतुक होत असून, युवकांनी दाखवलेले माणुसकीचे दर्शन समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
To Top