Baramati News l करंजेपुल ग्रामपंचायतीचा ठराव : लोकनेते अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेची निष्पक्ष चौकशी करा

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
करंजेपुल (ता. बारामती) येथील ग्रामपंचायतीच्या वतीने स्वर्गीय लोकनेते अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेत संशयास्पद झालेल्या अपघाती निधनाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, तसेच या प्रकरणात जे दोषी असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी, असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे.
              सदर ठराव महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री तसेच पुणे जिल्हाधिकारी यांना स्पीड पोस्टाने पाठविण्यात येणार आहे. लोकनेते अजितदादा पवार यांचे करंजेपुल गावासाठी मोठे योगदान राहिले असून, त्यांच्या स्मरणार्थ ग्रामपंचायत करंजेपुल येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी माजी सरपंच वैभव गायकवाड यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “अजितदादा पवार यांच्यासारखा नेता पुन्हा होणे कठीण आहे. दादा रोज सकाळी सहा वाजताच कामाला सुरुवात करीत असत. जनतेसाठी झटणारा असा नेता दुर्मिळ आहे.
या श्रद्धांजली कार्यक्रमास विद्यमान सरपंच पुजा वैभव गायकवाड, उपसरपंच सुहास माणिकराव गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य संभाजी गायकवाड, ग्रामसेवक सचिन लिंबरकर, श्रीकांत शेंडकर, लक्ष्मणराव लकडे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

लोकनेते अजितदादा पवार यांच्या विमान दुर्घटनेची सखोल व निष्पक्ष चौकशी व्हावी, हीच करंजेपुल ग्रामस्थांची ठाम मागणी असल्याचे ग्रामपंचायतीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
To Top