Baramati News l अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी करा; सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यात ठराव मंजूर

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नुकत्याच झालेल्या अपघाताबाबत अद्याप कोणताही अधिकृत शासकीय अहवाल समोर न आल्याने राज्यभरात चिंतेचे आणि संशयाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर, श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या सभेत या अपघाताची उच्चस्तरीय सखोल चौकशी व्हावी आणि त्यातील सत्य जनतेसमोर आणावे, असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे.
                 संचालक ऋषिकेश गायकवाड यांनी या चौकशीचा ठराव मांडला, ज्याला संपूर्ण संचालक मंडळाने उत्स्फूर्त पाठिंबा दिला. या ठरावाद्वारे दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या ठरावाची प्रत तातडीने खालील मान्यवरांकडे पाठवण्यात येणार आहे. मा. राष्ट्रपती व मा. पंतप्रधान मा. केंद्रीय गृहमंत्री व मा. केंद्रीय नागरी विमान उड्डाण मंत्री मा. राज्यपाल, मा. मुख्यमंत्री व मा. गृहमंत्री (महाराष्ट्र राज्य) यावेळी बोलताना कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप भावूक झाले होते. ते म्हणाले की, अजितदादांसारखे खंबीर नेतृत्व तयार होण्यासाठी कित्येक पिढ्या जाव्या लागतात. सोमेश्वर कारखान्याचा झालेला कायापालट, उभारलेले विविध प्रकल्प आणि शिक्षण संस्थांचे जाळे हे सर्व दादांच्या मार्गदर्शनाचे फलित आहे. त्यांच्याबाबत घडलेल्या या दुर्दैवी घटनेमागील सत्य काय आहे, हे जनतेला समजणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच आम्ही प्रशासनाकडे या चौकशीची मागणी करत आहोत.

सोमेश्वर सहकारी साखर कारखाना १९९२ पासून आजतागायत अजित पवार यांच्या विचाराने आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे. दादांच्या दूरदृष्टीमुळेच आज हा कारखाना राज्याच्या साखर उद्योगात अग्रस्थानी मानला जातो. आपल्या मार्गदर्शकाबाबत असलेल्या याच कृतज्ञतेपोटी आणि सुरक्षेच्या कारणास्तव कारखान्याने हा आक्रमक पवित्रा घेतला आहे.
To Top