“मुलगी शेतीत मदत करणारी असावी, शिकलेली नसली तरी चालेल,” असे स्पष्ट मत शेतकरी युवक गणेश आटोळे यांनी व्यक्त केले. डाळिंब शेतीतून वर्षाला सुमारे ५० लाख रुपयांचे उत्पन्न मिळते, अशी माहिती देताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. शेतकरी मुला-मुलींसाठी चांगले दिवस येणार असल्याची सकारात्मक भावना यावेळी उपस्थितांमध्ये दिसून आली.
यावेळी काही महिलांनी पुढे येत, मुलगा शेतकरी असला तरी चालेल, असे मत मांडले. त्यामुळे शेतकरी समाजाबाबत बदलणारी मानसिकता व सकारात्मक दृष्टीकोन या मेळाव्यातून स्पष्ट झाला. महाराष्ट्र राज्य शेगर धनगर महासंघ व शेगर धनगर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शेगर धनगर वधू-वर व पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन व श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे कार्याध्यक्ष भारत गावडे होते. यावेळी महासंघाचे अध्यक्ष सुनील भगत, माजी अध्यक्ष ॲड. जी. बी. गावडे, शेगर धनगर फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. अजय गाढवे, दशरथ आबा राऊत, दत्तात्रय माळशिकारे, सोपान आटोळे, किसनराव आटोळे, माजी उपआयुक्त हनुमंत नाझीरकर, दूध संघाचे माजी अध्यक्ष पोपटराव गावडे, निर्मला अनंता रोटे, महादेव गावडे, जायपत्रे सर, निळकंठ आटोळे, नानाभाऊ पंखुले, सोपानराव तुळशिराम आटोळे, रामदासभाऊ बिबे आदी मान्यवर उपस्थित होते.
मेळाव्यात ऑनलाईन व प्रत्यक्ष नोंदणी केलेले सुमारे २४० वधू-वर उपस्थित होते. पालकांचीही मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली. यावेळी १० वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा ट्रॉफी, पुस्तके व रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी समाजातील दानशूर व्यक्ती व उद्योजक सुनील येडे, माजी प्राचार्य शिवाजी गावडे, कारखाना संचालक राजेंद्र गावडे, बाळासाहेब गावडे, सुनील भगत तसेच दत्तकृपा नागरी सहकारी पतसंस्था यांचे विशेष सहकार्य लाभले.
यावेळी वधू-वरांचे बायोडाटा वाचन शेगर धनगर फाउंडेशनचे सचिव प्रा. संभाजी साबळे सर व डॉ. सरोजनी सतीश खोमणे यांनी केले. प्रास्ताविक महासंघाचे अध्यक्ष सुनील भगत यांनी केले. सूत्रसंचालन अमोल धापटे यांनी केले तर आभार प्रदर्शन महासंघाचे सचिव प्रा. शिवलाल गावडे यांनी मानले.
