सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोरला एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात बुधवार दि.२५ पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.न्यायाधीश एस.एम. टाकळीकर यांनी हा निकाल देत आरोपीला दोषी ठरवले.आरोपी बजरंग रामचंद्र खोपडे (वय ३२ रा. तेलवडी, ता.भोर)याला २० वर्षांची सक्तमजुरी झाली असून या प्रकरणी ३५ वर्षीय महिलेने राजगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
तालुक्यातील एका ॲग्रो टुरिझम केंद्रावर पीडित मुलीची आई स्वयंपाकाचे काम करत होती.आरोपीही त्याच ठिकाणी नोकरीस होता.मुलगी आईला भेटण्यासाठी येत असताना आरोपीने तिला फसवून फार्ममधील खोलीत नेले आणि जबरदस्तीने अत्याचार केले. हा प्रकार कुणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिल्याने पीडित मुलगी दीर्घकाळ गप्प राहिली होती.नोव्हेंबर २०१८ मध्ये घडलेल्या या घटनेत आरोपीने मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही तिला धमकावून अत्याचार केल्याचे तपासात निष्पन्न झाले.पीडित मुलीची प्रकृती मार्च २०१९ मध्ये अचानक बिघडल्याने तिला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले असता ती गरोदर असल्याचे उघड झाले आणि धक्कादायक प्रकार समोर आला.तक्रारीनंतर राजगड पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी ३० मार्च २०१९ रोजी आरोपीला अटक करून तपास पूर्ण केला.
सरकारी पक्षातर्फे ॲड. अरुंधती ब्रम्हे यांनी खटल्यात प्रभावी बाजू मांडली. न्यायालयाने ती ग्राह्य धरत आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंड ठोठावला. तसेच धमकी दिल्याबद्दल भारतीय दंड संहिता कलम ५०६ अंतर्गत एक वर्ष सक्तमजुरी व १ हजार रुपये दंडाचीही शिक्षा सुनावण्यात आली. या खटल्यात एकूण ११ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली.या प्रकरणाच्या तपासासाठी राजगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश गवळी, पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. जी. राठोड, फौजदार विद्याधर निचित व सहाय्यक फौजदार साहेबा बाबर यांनी सरकारी पक्षास सहकार्य केले.
