सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
निंबुत (ता. बारामती) येथील ओढ्यालगत सुरू असलेल्या गावठी हातभट्टी दारूच्या अड्ड्यावर वडगाव निंबाळकर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ३ लाख ५९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
निंबुत गावच्या हद्दीतील लक्ष्मीनगर येथील रहिवासी प्रमोद प्रकाश नवले हा ओढ्यालगत गावठी हातभट्टी लावून दारू तयार करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी धाड टाकली. पोलिसांनी केलेल्या या पाहणीत घटनास्थळावरून ३ लोखंडी बॅरलमधील कच्चे रसायन, जमिनीतील खड्ड्यात साठवलेले रसायन, २ प्लास्टिक टाक्या, ३५ लिटर क्षमतेचे २४ कॅन गावठी दारू, ४ विद्युत मोटर पंप आणि इतर साहित्य असा एकूण ३,५९,००० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात येत आहे.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड आणि स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यामध्ये सपोनि नागनाथ पाटील, हवालदार पोपट नाळे, अनिल खेडकर, शुभांगी दणाने, अंमलदार आबा जाधव, नरेंद्र यादव, धनंजय भोसले, विकास येटाळे, प्रियांका झणझणे आणि चालक विजय शेंडकर यांचा समावेश होता.
