सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : सोमनाथ साखरे
सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातुरचे पालकमंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मतदार संघातील जावली तालुक्यात बाबाराजेंचे वर्चस्व असलेल्या कुसुंबी गटाने भाजपचा परावभ करून शिवसेनेने स्वतःचे वर्चस्व निर्माण केले.
भाजपचा कुडाळ गट पुर्णपणे भाजपमय राहीला तर म्हसवे गटात तुतारीची तुतारी वाजली आहे. जिल्हा परिषद गटामध्ये तीन पैकी दोन भाजप तर एक शिवसेने काबीज करीत पंचायत समितीत सहापैकी तीन भाजप तर आघाडीने तीन जागा मिळवून बरोबरी साधली आहे.
भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या जावलीतील मतदारांनी बाबाराजेंना चिंतन करण्याचा सल्ला मतदान पेटीतून दिल्याचे आजच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. शिवसेनेचे उप मुख्य मंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी केळघर मध्ये प्रचाराची सुरुवात केली ती लाडक्या बहिणींच्या कानापर्यत पोहचल्याने कुसुंबी गटामध्ये परिवर्तन दिसुन येते.
भाजपला एकहाती सत्ता येईल असे वाटत असताना शिवसेनेने गनिमी कामा करीत भाजच्या आशा आकांक्षावर पाणी फिरवुन कुसुंबी गट काबीज करून गणांचे उमेदवार ही निवडून दिले.कुसुंबी गटामध्ये भाजच्या सौ. अर्चनाताई ज्ञानदेव रांजणे ( एकुण मते - ८७७१ ) यांचा विजय निश्चित मानला जात असताना त्यांना शिवसेनेच्या सौ. कविता एकनाथ ओंबळे ( एकूण मते - ८९५१ ) यांनी अवघ्या १८० मतांनी पराजित केले तर आंबेघर तर्फ कुडाळ या गणातील शिवसेनेचे अतिश कदम ( एकुण मते - ५१७५ ) यांनी भाजपचे विजय सपकाक ( एकुण मते - ४४५३ ) यांचा ७२२ मतांनी पराभव केला आहे. कुसुंबी गटातील व गणातील पराजय भाजपला आत्मचिंतन करायला लावणारे ठरले आहेत.
कुडाळ गटाने भाजपला चांगली साथ दिली असल्याचे चित्र स्पष्ट झाले. याठिकाणी भाजपचे उमेदवार हभप सौ. जयश्रीताई सुहास गिरी ( एकुण मते - ११९१७ ) यांनी राष्ट्रवादीच्या तुतारीचा आवाज दाबत पुनम नायकुडे ( एकुण मते - ५२०१ ) यांचा ६ हजार ७१६ मतांनी बलाढय असा पराभव केला आहे तर अपक्ष उमेदवार जयश्री शेवते यांना २ हजार ३६० मतांवर समाधान मानावे लागले आहे.
तसेच कुडाळ गणामध्ये भाजपचे सौरभ शिंदे ( एकूण मते - ५२०९ ) यांनी राष्ट्रवादीचे राजेंद्र शिंदे ( एकूण मते - ३१३२) यांचा २ हजार ७७ अशा मोठ्या फरकाने पराजय केला आहे तर शिवसेना ( उबाठा ) चे उमेदवार प्रशांत तरडे यांना ६०९ मते तर अपक्ष उमेदवार राजेंद्र शेवते यांना १९३ मते मिळाली आहेत.
म्हसवे गटा बाबत सगळ्यांनाच भाजपचे उमेदवार वसंतराव मानकुमरे यांची ईट्टी होणार असे वाटत असताना म्हसवे गटावर जादुची कांडी फिरवत वसंतराव मानकुमरे ( एकूण मते - ९८९़८ ) यांनी २ हजार २२७ मतांनी विजय मिळवत प्रतिस्पर्धी शिवसेनेचे संदिप पवार ( एकुण मते - ७६७१ )यांचा पराभव केला तर अपक्ष उमेदवार संतोष शिराळे यांना ३०० मतांवर समाधान मानावे लागले.
खर्शी बारामुरे गणामध्ये भाजपचे गोरखनाथ महाडीक ( एकुण मते - ४४२९ ) यांनी राष्ट्रवादीचे विठ्ठल गोळे ( एकूण मते - ३५६३ ) यांचेवर ८६६ मतांनी निसटता विजय मिळविला आहे. अपक्ष किरण गायकवाड यांना २१३ मते मिळाली तर म्हसवे गणामध्ये भाजपच्या रेश्मा पोफळे ( एकूण मते - ४६५५) यांचा राष्ट्रवादीच्या सौ. शिल्पा शिंदे ( एकूण मते - ४८५० ) यांनी १९५ मतांनी चारीचित्त करून विजय मिळवला आहे तर अपक्ष संगीता भिसे यांना फक्त ८३ मते मिळाली आहेत.
बाबाराजेंच्या बालकिल्यात मिळावलेल्या यशामुळे आनंदीत झालेल्या शिवसेनेने फटाके बाजी करून गुलालाची उधळण करीत भव्य अशी मिरवणूक काढली तर कुसुंबी गटातील भाजपच्या पराजयाने भाजपचा उत्साह कमी दिसुन आला.
