सोमेश्वर रिपोर्टर टीम----
जावळी : प्रतिनिधी
जावली तालुका हा शिक्षकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी नेहमीच अग्रेसर राहिला असून राज्य शिक्षक संघाच्या विविध उपक्रमांमध्ये सातत्याने सहभाग नोंदवत आला आहे. येत्या ५ व ६ मार्च रोजी मुंबईतील शिवाजी पार्क येथे आयोजित शिक्षक संघाच्या भव्य अधिवेशनास जावली तालुक्यातून तब्बल ४०० शिक्षक उपस्थित राहणार असल्याची माहिती जावली तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष तानाजीराव आगुंडे यांनी दिली.
आज जावली तालुका प्राथमिक शिक्षक संघाची सहविचार सभा उत्साहात पार पडली. या सभेस अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष सिद्धेश्वर पुस्तके, सातारा जिल्हा शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष मच्छिंद्र मुळीक, सातारा जिल्हा शिक्षक संघाचे अध्यक्ष महेंद्र जानुगडे तसेच सातारा जिल्हा शिक्षक संघाचे माजी कोषाध्यक्ष मिलन मुळे उपस्थित होते. या वेळी अधिवेशनास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. याप्रसंगी जावली तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष आर. टी. दळवी, नेते विनायक चोरट, सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक विजय शिर्के, कार्याध्यक्ष संदीप किर्वे, कोषाध्यक्ष दत्तात्रय चिकणे, नेते संजय धनावडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जावली तालुक्यात जोरदार पूर्वतयारी सुरू असून शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण असल्याचे आगुंडे यांनी सांगितले. विविध प्रलंबित प्रश्न, शैक्षणिक धोरणे आणि शिक्षकांच्या हक्कांबाबत या अधिवेशनात महत्त्वपूर्ण चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले. सभेस अशोकराव जांभळे, बाबुराव भोसले, विजय भोसले आदींचीही उपस्थिती होती.
