सोमेश्वर रिपोर्टर टीम-----;
लोणंद : निलेश काशीद
सुखेड (ता. खंडाळा) येथे तरुणाचा गळा आवळून निर्घृण खून करून मृतदेह पेटवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा सातारा व लोणंद पोलिस ठाण्याच्या संयुक्त कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेत सोमनाथ कल्याण बोबडे (रा. सेक्टर २०, कळंबोली, ता. पनवेल, जि. रायगड) यांचा मृत्यू झाला आहे.
दि. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास सुखेड गावाच्या हद्दीत चोपडे वस्तीजवळ एका अनोळखी इसमाचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता. मृताच्या गळ्यावर आवळल्याच्या खुणा दिसून आल्याने हा खून असल्याचे स्पष्ट झाले होते. याप्रकरणी लोणंद पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांनी तपासाच्या सूचना दिल्या. पोलीस निरीक्षक अरुण देवकर व सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले.
तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात आला. चौकशीत मयत सोमनाथ बोबडे यांचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. खून केल्यानंतर मृतदेह होंडा सिटी कार (MH-12 DY 8846) मधून सुखेड परिसरात आणून त्यावर पेट्रोल ओतून पेटवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे आरोपींनी कबूल केले.
या प्रकरणी पोलिसांनी बंडू बापू भिसे (वय ४९), रा. के.एल. ५, बिल्डिंग नं. १५, रूम नं. १६, सेक्टर ३ ई, कळंबोली, ता. पनवेल, जि. रायगड (मूळ रा. दुधेबावी, ता. फलटण, जि. सातारा), विजय पोपटराव पवार (वय ३६), रा. साखरवाडी, मार्कड मळा, ता. फलटण, जि. सातारा, किरण विकास गायकवाड (वय २७), मूळ रा. होळ, ता. फलटण, जि. सातारा, सध्या रा. पंचम सोसायटी, पारी चौक, गणपती मंदिराजवळ, दुसरा मजला, पुणे, व श्रीनिवास ज्ञानेश्वर लोणे (वय २५), मूळ रा. चुरमापुरी, ता. अंबड, जि. जालना, सध्या रा. धायरीश्वर संकुल, रायकर मळा, धायरी, पुणे. या चार आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाचा अवघ्या ७२ तासांत छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून, आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले वाहन व साहित्य जप्त करण्यात आले आहे. पुढील तपास सुरू असून या उल्लेखनीय कामगिरीबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपास पथकाचे कौतुक केले आहे.
